मोठा कलाकार होण्याची इच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 06:26 PM2019-03-30T18:26:44+5:302019-03-30T18:26:50+5:30
‘चला हवा येऊ द्या’ फेम बाल कलाकार व कोपरगावचा नातू अर्णव अतुल कालकुंद्री याने भविष्यात मोठा कलाकार होण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
रियाज सय्यद
कोपरगाव : ‘चला हवा येऊ द्या’ फेम बाल कलाकार व कोपरगावचा नातू अर्णव अतुल कालकुंद्री याने भविष्यात मोठा कलाकार होण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
‘अर्णव’चे बुधवारी सायंकाळी शहरातील त्याचे आजोबा सुरेश कालकुंद्री यांच्या घरी आगमन झाले. यावेळी त्याने ‘लोकमत’शी दिलखुलास संवाद साधला. प्रकाश पारखी यांच्या ‘दिवाकर स्मृती नाट्य छटा’ या संस्थेत नाट्य अभिनयाचे धडे गिरविताना ‘पडली रे पडली’ या एकपात्री प्रयोगातून ‘अर्णव’चा रंगमंच प्रवेश झाला. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’मध्ये तब्बल १५ हजार स्पर्धकांमधून पहिल्या १५ मध्ये त्याची निवड झाली. ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. खूप चंचल असल्याने लहानपणी तो अनेक कलाकारांच्या नकला करीत असे. त्याने ‘माता अनुसया प्रोडक्शन हाऊस’ मध्ये प्रवेश घेतला. केवळ अडीच वर्षाचा असताना ‘अर्णव’ची राम रक्षा तोंड पाठ होती. ७ बाल नाट्यात त्याने काम केले.
‘अर्णव’ला आतापर्यंत १३-१५ बक्षिसे मिळाली. ‘अर्णव’ने आतापर्यंत ३ लघु चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले आहे. जाहिरातींमध्येही त्याला काम करण्याची संधी प्राप्त झाली. ‘मार्गगम डान्स अकादमी’ कडून नृत्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. विशेष म्हणजे शाळेकडे दुर्लक्ष होऊनही अभ्यासात तो मागे नाही. आगामी काळात विविध भूमिका साकारून मोठा कलाकार होण्याची इच्छा त्याने बोलून दाखविली. सिनेअभिनेते विवेक ओबेरॉय, सोनाली बेंद्रे, उमंग कुमार, हुमा कुरेशिका, सुबोध भावे, निशिगंधा वाड, अलका कुबल, प्रवीण तरडे, अद्वैता दादरकर, सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर यासारख्या कलाकारांशी ‘अर्णव’चे जवळचे संबंध आले आहेत. त्याचा फायदा भविष्यात होऊ शकेल.
यावेळी मुकुं द कालकुंद्री, आजी अनिता कालकुंद्री, सुनील कालकुंद्री, अपूर्वा एडगावकर, आई सोनाली कालकुंद्री आदी उपस्थित होते.