बीपीचा त्रास असूनही ८९ वर्षीय आजोबांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:40+5:302021-04-27T04:20:40+5:30
योगेश गुंड केडगाव : तुमच्या मनातील सकारात्मक ऊर्जा, आजाराला हरवण्याची प्रचंड इच्छाशक्ती, वेळेत घेतलेले उपचार आणि कुटुंबियांनी दिलेला मानसिक ...
योगेश गुंड
केडगाव : तुमच्या मनातील सकारात्मक ऊर्जा, आजाराला हरवण्याची प्रचंड इच्छाशक्ती, वेळेत घेतलेले उपचार आणि कुटुंबियांनी दिलेला मानसिक आधार या जोरावर सारोळा कासार (ता. नगर) येथील ८९ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली. विशेष म्हणजे या आजोबांना बीपी (ब्लड प्रेशर)चा त्रास होता. तरीही त्यांनी रुग्णालयात ॲडमीट न होता डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच विलगीकरणात राहून कोरोनाला चारीमुंड्या चित करीत अस्मान दाखवले. बबनराव सखाराम जाधव या ८९ वर्षीय आजोबांचा कोरोनाविरोधातील ही लढत व सकारात्मकता अनेक रुग्णांना प्रेरणादायी ठरावी, अशीच आहे.
आयुष्यभर शेती व कष्टाचे कामे केलेले बबनराव जाधव वय वाढल्याने शरीराने थकले आहेत. शरीर थकले असले तरी त्यांनी मन कधीच थकू दिले नाही, याची प्रचिती त्यांनी सर्वांना दाखवून दिली.
नगर तालुक्यातील सारोळा कासार गाव सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. गावातील कोरोना बाधितांची संख्या २५०च्या घरात आहे. गावात कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातल्याने अनेकांच्या मनात कोरोनाने भीती निर्माण केली. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच जाधव यांना प्रचंड अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला यांचा त्रास जाणवू लागला. ही सर्व कोरोनाची लक्षण आहेत, हे लक्षात येताच त्यांचे नातू दत्तात्रय जाधव यांनी त्यांची ४ एप्रिलला कोरोनाची तपासणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. ताप अंगावर न काढता त्वरित दवाखान्यात जाऊन चाचणी केली. त्यांचा स्कोर ५ आला. जाधव यांचे सारे कुटुंब त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांना मानसिक आधार दिला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करून त्यांनी १४ दिवस घरीच विलगीकरणात काढले. रक्तदाबाचा त्रास असूनही दवाखान्यात भरती न होता त्यांनी घरच्या घरी औषधोपचार सुरू केले. गावात कोरोनाने थैमान घातले असतानाही त्यांनी प्रचंड इच्छाशक्ती व सकारात्मकता दाखवत कोरोनाशी दोन हात केले. याच काळात त्यांची सेवा करताना कुटुंबातील काही सदस्यही बाधित झाले. मात्र, अंगावर न काढता वेळीच तपासण्या करून सर्वांनी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे विलगीकरणात राहून एकमेकांना मानसिक आधार देण्याचे काम केले. जगण्याची उमेद आणि मनातील सकारात्मक ऊर्जा या जोरावर ८९ वर्षीय बबनरावांनी अवघ्या ९ दिवसातच कोरोनाला पराभूत केले. मात्र, तरीही ते १४ दिवस विलगीकरणात राहिले. आजार अंगावर न काढता वेळीच तपासण्या करून औषधोपचार घेतल्याचा त्यांना फायदा झाला.
.....................
कोरोनाला हरवून पुन्हा रमले शेतीत
८९ वर्षीय बबनरावांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली. १४ दिवस औषधोपचार व विलगीकरणाचा काळ संपताच ते पुन्हा नव्या उमेदीने आता शेतातील कामे करण्यासाठी सरसावले आहेत. बीपीचा आजार असून व शरीर थकलेले असतानाही त्यांना औषधोपचार व कुटुंबियांचा मानसिक आधार मिळाल्याने ते या संकटातून सहज बाहेर पडले.
...............
कोरोना झाल्याचे कळताच सुरुवातीला थोडी भीती वाटली. कारण गावातील दु:खद घटना कानावर येत होत्या. मात्र, माझ्या कुटुंबियांनी मला मोठा मानसिक आधार दिला. काहीच होत नाही, तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही लवकर बरे व्हाल. या त्यांच्या शब्दांनी मी औषधोपचार करून आता पूर्ण बरा झालो आहे.
- बबनराव जाधव, कोरोनामुक्त झालेले वयोवृद्ध शेतकरी