निविदा होऊनही ११६ कामे वर्क ॲार्डरच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:23 AM2021-02-09T04:23:36+5:302021-02-09T04:23:36+5:30
जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग दर्जाचे रस्ते, दुरुस्ती, तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतून शाळाखोल्या, अंगणवाड्या, स्मशानभूमी, ...
जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग दर्जाचे रस्ते, दुरुस्ती, तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतून शाळाखोल्या, अंगणवाड्या, स्मशानभूमी, पशुवैद्यकीय दवाखाने, विश्रांतीगृह, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती, तसेच जुन्या इमारतींची देखभाल दुरुस्ती अशी अनेक कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केली जातात.
जिल्हा परिषदेत बांधकामच्या दक्षिण विभागात ५६, तर उत्तर विभागात ६० अशी एकूण ११६ कामे केवळ कार्यारंभाअभावी रखडली आहेत. त्यात बहुतांश कामे २०१९-२० या आर्थिक वर्षातील आहेत, तर काही कामे पंधराव्या वित्त आयोगाची चालू वर्षातील (२०२०-२१) आहेत. लॅाकडाऊनमध्ये खर्चाबाबत शासनाकडून काही निर्बंध आल्याने कामे रखडली होती. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया पूर्ववत झाली असून अनेक कामांच्या निविदा काढल्या गेल्या, ठेकेदारही निवडले. परंतु त्या ठेकेदारांना अद्याप कार्यारंभ आदेश दिले गेलेले नाहीत.
दहा लाख रुपयांपर्यंतची कामे मंजुरीचे अधिकार बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांना, २० लाखांपर्यंतचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, २० लाखांपर्यंतचे अधिकार विषय समित्यांच्या सभापतींना, ५० लाखांपर्यंतचे अधिकार स्थायी समितीला, तर त्यावरील अधिक रकमेचे अधिकार सर्वसाधारण समितीला आहेत.
प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर संबंधित कामांच्या निविदा काढून ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्यात येतात. निविदा निघालेली अशी ११६ कामे बांधकाम विभागात पडून असून, ती कार्यारंभ आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्व कागदपत्रे पूर्ण करूनही केवळ चिरीमिरीसाठी फाईल टेबलवर अडवली जाते. मार्चएण्डमुळे अनेक कामे पूर्ण करण्याची घाई असतानाही ती कामे मुद्दामहून अडवून ठेवली जातात. त्यामुळे यात पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही लक्ष घालून ही कामे मार्गी लावावीत, अशी मागणी ठेकेदारांकडून होत आहे.
--------------
ज्या कामांच्या निविदा झाल्या, त्याचे कार्यारंभ आदेश तातडीने काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ठेकेदारांकडून काही कागदपत्रांची पूर्तता राहिली असेल तर त्यास वेळ लागू शकतो. परंतु मध्यंतरी आढावा घेऊन आठवडाभरात फाइल मार्गी लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ठेकेदारांची पदाधिकाऱ्यांकडून अडवणूक होत नाही. कार्यालयात होत असेल तर तशी तक्रार करणे गरजेचे आहे.
- काशीनाथ दाते, सभापती बांधकाम समिती
-------
बांधकामची प्रलंबित कामे
निविदा पूर्ण - ११६
वर्क ऑर्डरअभावी रखडली - दक्षिण ५६, उत्तर ६०