साईनगरीला प्रदूषणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 03:55 PM2018-10-30T15:55:14+5:302018-10-30T15:55:17+5:30
जगविख्यात असलेली श्री साईबाबांची शिर्डी म्हणजेच साईनगरी सर्वत्र ध्वनी व वायू प्रदुषणाने ग्रासली गेल्याने साईभक्तांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
रियाज सय्यद
शिर्डी : जगविख्यात असलेली श्री साईबाबांची शिर्डी म्हणजेच साईनगरी सर्वत्र ध्वनी व वायू प्रदुषणाने ग्रासली गेल्याने साईभक्तांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सध्या साईनगरीचे तापमान साधारणत: ३१ ते ३३ अंश सेल्सिअस इतके आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. वातावरणातील आर्द्रता मानवी आरोग्यास घातक आहे. शिर्डीसारख्या आंतरराष्टÑीय दर्जाच्या धार्मिक स्थळी साई समाधी दर्शनासाठी देश-विदेशातील साईभक्त मोठ्या संख्येने येतात. विमान, रेल्वे, एस.टी. बसेस व खासगी वाहनांच्या सहाय्याने साईभक्तांना प्रवास करावा लागतो. शिर्डी शहर व परिसरात निवासी व वाणिज्य वापराची जागा असून औद्योगीकरण झालेले नाही. शहरात दररोज किमान ६० हजार भाविकांची रेलचेल असते. विजयादशमी, गुरूपौर्णिमा व रामनवमी या तिन्ही उत्सवाच्या काळात भाविकांचा आकडा काही लाखांवर जातो.
शहरात लक्ष्मीनगर नाला, सुलभ शौचालये, कचरा संकलन केंद्र यामुळे देखील प्रदूषण जाणवते. साईभक्तांच्या गर्दीने जीव गुदमरतो. असंख्य वाहनांमधून निघणाऱ्या धुराने परिसर अच्छादून जातो. त्याचे आरोग्यावर हानीकारक परिणाम होतात. नैसर्गिक व अनैसर्गिक प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी हृदयाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे साईभक्तांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वच्छ भारत अभियानात शिर्डी शहराने देशात नावलौकीक प्राप्त केला आहे. नगरपंचायतीतर्फे दैनंदिन कचरा वर्गीकरण करून संकलीत केला जातो. मात्र स्वच्छतेविषयी देश-विदेशातून येणाºया भाविकांमध्ये अधिक प्रचार-प्रसार करण्याची गरज आहे.
लक्ष्मीनगर नाला नगरपंचायतीच्या अखत्यारीत आहे. ५० टक्के उघड्या नाल्यालगत झोपडपट्टी असल्याने सांडपाण्याचे प्रदूषण होते. तर उर्वरित ५० टक्के नाला बंदिस्त आहे. शहरात भुयारी गटार योजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत कुठल्याही प्रकारे प्रदूषित होत नाहीत. ओल्या कचºयापासून खत निर्मिती केली जाते. त्यामुळे प्रदूषण होत नाही. सभा व उत्सवांमुळे सतत ध्वनी प्रदूषण असते. या काळात ८५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज असल्याने नियमांचे पालन होत नाही. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहतुकीच्या दृष्टीने ध्वनी व वायू प्रदूषणाचे मोजमाप होणे गरजेचे आहे. - सतीश दिघे, मुख्याधिकारी.