त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा उत्सवानिमित्त देवगडला भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:27 PM2019-11-12T13:27:32+5:302019-11-12T13:28:41+5:30
त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.
नेवासा : त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. वेदमंत्रांच्या जयघोषात धार्मिक कार्यक्रम पार पडले.
कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. यानिमित्ताने देवगडच्या गंगाघाटावर हजारो भाविकांनी गंगास्नान केले. प्रवरामाईला पंचारती ओवाळून पूजा केली. मंदिर प्रांगणात विधीवत पूजेने त्रिपुरा वाती पेटविल्या. मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये असंख्य जोडप्यांनी देखील कार्तिक स्वामींच्या चांदीच्या मूर्तीस अभिषेक घातला. कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने पहाटे चार वाजेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी झाली होती. त्यानंतर गर्दीचे रूपांतर दर्शनबारीत झाले. दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांशी सुसंवाद साधत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी स्वागत केले.
उत्सवानिमित्त मंदिराच्या बाहेरील प्रांगणात दुकाने थाटली होती. त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त कणकोरी, जामगाव, गळनिंब येथील भक्त परिवाराच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
मंगळवारी दुपारी बारा वाजता झालेल्या महाआरती प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या समवेत राजस्थान येथील भागवताचार्य महंत परमपूज्यनीय पवनकुमार मालोदिया महाराज हे उपस्थित होते. मंदिर प्रांगण भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. प्रत्येकाच्या हातात कार्तिक स्वामींना प्रिय असलेले मोरपीस सर्वांचे आकर्षण ठरले होते. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून भक्त परिवाराने स्वयंसेवकांची भूमिका मोठी जबाबदारी पार पाडली.