भूईकोट किल्ल्याचा विकास ‘बंदीवासा’त; पाच कोटीच्या आराखड्याला भाजपने दिले फक्त ५० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:22 PM2020-01-29T12:22:01+5:302020-01-29T12:23:16+5:30

जिल्हा प्रशासनाने किल्ला शुभोभिकरणाच्या दृष्टीने सुमारे पाच कोटींचा आराखडा दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठवला, मात्र शासनाकडून भरीव निधी मिळत नसल्याने किल्ला डागडुजीच्या प्रतीक्षेत खितपत पडला आहे.

Development of Bhuikot fort into 'captive'; BJP provided only Rs 5 lakh for the five crore plan | भूईकोट किल्ल्याचा विकास ‘बंदीवासा’त; पाच कोटीच्या आराखड्याला भाजपने दिले फक्त ५० लाख

भूईकोट किल्ल्याचा विकास ‘बंदीवासा’त; पाच कोटीच्या आराखड्याला भाजपने दिले फक्त ५० लाख

आदित्य ठाकरे नगरला काय देणार?-वृत्त मालिका /

चंद्रकांत शेळके । 
अहमदनगर : सव्वापाचशे वर्षांपूर्वीचा ठेवा, तसेच अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला नगरचा भूईकोट किल्ला देखभाल-दुरूस्तीअभावी भग्नावस्थेत लोटला जात असून शासनाच्या उदासिनतेमुळे किल्ल्याकडे पर्यटकांचा पाय फिरकेनासा झाला आहे. जिल्हा प्रशासनाने किल्ला शुभोभिकरणाच्या दृष्टीने सुमारे पाच कोटींचा आराखडा दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठवला, मात्र शासनाकडून भरीव निधी मिळत नसल्याने किल्ला डागडुजीच्या प्रतीक्षेत खितपत पडला आहे. आता नव्या सरकारमधील पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे नगरला काय देणार? याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. 
निजामशाहीचा संस्थापक अहमद बादशाहाने नगर शहर वसविण्यापूर्वी इ.स. १४९० मध्ये भूईकोट किल्ला बांधला. किल्ल्यास २२ बुरुज आहेत. किल्ल्याभोवती अभेद्य तटबंदी आहे व त्याभोवती विस्तीर्ण खंदक आहेत. खंदक ओलांडण्यासाठी ब्रिटिशांच्या काळात इ.स. १८३२ मध्ये मागील बाजूस झुलता पूल बांधण्यात आला होता. त्याचे अवशेष अजूनही किल्ल्यात पहायला मिळतात. वर्तुळाकार असलेला हा किल्ला अंतर्गत ६० एकरवर पसरलेला असून खंदकासहित किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ८० एकरपेक्षा जास्त आहे.
मुघल, पेशव्यांपासून इंग्रजांपर्यंत अनेकांचे बंदिवान या किल्ल्यात कैद होते. १९४२च्या चले जाव आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या राष्ट्रीय नेत्यांना १९४५ पर्यंत ब्रिटिशांनी याच किल्ल्यात स्थानबध्द केले होते. नेहरुंनी या किल्ल्यातच ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. 
असा सुमारे सव्वापाचशे वर्षांचा नगरचा इतिहास या किल्ल्याशी जोडला गेलेला आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक गड-किल्ले दुर्गम भागात व शहरापासून कोसो दूर असूनही पर्यटक तेथे आवर्जून येतात. मात्र नगरचा किल्ला अगदी शहरात असूनही केवळ तेथील सोयी-सुविधांअभावी पर्यटकांच्या नजरेत भरत नाही. दरम्यान, किल्ल्याच्या सुशोभि-करणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी ४ कोटी ९३ लाख रूपयांची मागणी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडे केली. पहिल्या टप्प्यात ५० लाख रूपये प्राप्त झाले. त्यातून प्रशासनाने किल्ल्याभोवतीची, तसेच आतील झाडेझुडपे काढली. तसेच जॉगिंग ट्रॅकचे काम केले.  सात महिन्यांपूर्वी तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी किल्ल्यामध्ये बैठक घेऊन दीड कोटी रूपये देण्याचे मान्य केले होते. आता सरकार बदलले, मात्र तो निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्हा प्रशासनाने पर्यटन विभागाकडे निधीची मागणी केली, मात्र अद्याप शासन निधी देण्याबाबत उदासिन आहे. 
किल्ला सैन्यदलाकडे 
सन १९४७ पासून आजतागायत भूईकोट किल्ला भारतीय सैन्यदलाच्या ताब्यात आहे. सध्या किल्ल्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशा वेळेत प्रवेश मिळतो. त्यासाठी सरकारी ओळखपत्र अनिवार्य आहे. किल्ल्यात प्रवेश खुला असला तरी राष्ट्रीय सण वगळता किल्ल्याकडे पर्यटक पाठच फिरवतात. 

किल्ल्याच्या सर्व बाजूने परिसर स्वच्छ करण्याचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय जॉगिंग ट्रॅक व वृक्षारोपण करण्याचे कामही केले आहे. परंतु किल्ल्याची उर्वरित डागडुजी व इतर कामे होण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. तो शासनाकडून अद्याप प्राप्त झालेला नाही. किल्ल्याची प्रस्तावित सर्व कामे झाल्यानंतर किल्ल्याकडे पर्यटकांचा ओघ वाढू शकेल, असे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.    
    
भूईकोट किल्ल्याला सव्वापाचशे वर्षांचा इतिहास आहे. पर्यटनाच्या दृष्टीने किल्ला विकसित केला तर पर्यटकांची रांग लागेल एवढे वैभव भूईकोटचे आहे. भूईकोटसह जिल्ह्यातील इतरही धार्मिक व पर्यटनस्थळांचा विकास झाला तर नगरची वेगळी ओळख राज्य व देशभर निर्माण होईल, असे इतिहासप्रेमी जयंत येलूलकर यांनी सांगितले.  
 

Web Title: Development of Bhuikot fort into 'captive'; BJP provided only Rs 5 lakh for the five crore plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.