थोरातांच्या आरोपांना योग्यवेळी उत्तर देऊ-देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 05:17 PM2020-01-11T17:17:06+5:302020-01-11T17:18:07+5:30
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आरोपांना योग्यवेळी उत्तर देऊ, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
अहमदनगर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आरोपांना योग्यवेळी उत्तर देऊ, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
फडणवीस हे एका कार्यक्रमासाठी शनिवारी औरंगाबाद येथे जात असताना अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी खासदार दिलीप गांधी, माजीमंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीस यांचा सत्कार केला.
हे सरकार अधिक काळ टिकणार नाही या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची थोरात यांनी खिल्ली उडवली होती. फडणवीस म्हणाले होते, त्यांना २२० पेक्षा जास्त जागा मिळतील. ते असेही म्हणाले होते की, विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्या जागा विरोधकांना मिळणार नाहीत. पण त्यांची सर्व भाकिते खोटी ठरली. त्यामुळे फडणविसांनी आता कुठलेही भाकित करण्यापूर्वी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा, अशी टीका थोरात यांनी फडणवीस यांच्यावर केली होती. यावर पत्रकारांनी फडणवीस यांना छेडले असता त्यांनी योग्य वेळी उत्तर देऊ एवढे मोजकेच बोलले. त्यानंतर ते औरंगाबादकडे रवाना झाले.