श्रीक्षेत्र देवगडचा यावर्षीच्या पायी पालखी सोहळा रद्द; भास्करगिरी महाराजांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 03:15 PM2020-05-22T15:15:48+5:302020-05-22T15:17:04+5:30
महाराष्ट्रात शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पायी पालखी सोहळा यावर्षी स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.
नेवासा : महाराष्ट्रात शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पायी पालखी सोहळा यावर्षी स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.
दत्त मंदिर संस्थानने शुक्रवारी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रासह विविध राज्यातून लाखो भाविक पायी दिंडीने पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. शेकडो वर्षाची ही परंपरा आहे. यावर्षी करोना रोगाचा प्रादुर्भाव असल्याकारणाने शासन प्रशासनाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्याचा विचार करता अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी अनेक निर्बंध आलेले आहे. या परिस्थितीत अनेक पायी दिंडी सोहळे पंढरपूरमध्ये दाखल झाल्यास कोरोनाचा वेगवान प्रसार होईल. त्याचा गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागेल. यामुळे सामाजिक व सार्वजनिक प्रश्न उपस्थित होईल. त्यादृष्टीने दिंडी सोहळ्यातील प्रमुख दिंडी चालकांनी आषाढ एकादशीच्या दिवशी अत्यल्प संख्येने पादुका बरोबर घेऊन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच भूमिकेतून श्री समर्थ किसनगीरी बाबा पायी पालखी सोहळा व्यवस्थापन समितीने यावर्षी दिंडी सोहळा स्थगित ठेवला आहे. परमपूज्य बाबांच्या पादुका खाजगी वाहनाने अल्प सहका-यांसह आषाढीला पंढरपूर येथे नेण्यात येतील. परंतु त्या पादुका पंढरीनाथाच्या दर्शनासाठी न जाता चंद्रभागेमध्ये पादुकास्नान करवून दिंडी सोहळा विसर्जित करून देवगडच्या भक्त निवासात पालखी तीन-चार दिवस थांबण्यात येईल. किंवा त्याचदिवशी पादुका पालखी देवगडला येतील, असा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे, असेही भास्करगिरी महाराज यांनी सांगितले.