धांदरफळ बुद्रूक कोरोनाबाधीत हॉटस्पॉट क्षेत्र; १६२९ ग्रामस्थांची होणार दैनंदिन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 11:58 AM2020-05-10T11:58:59+5:302020-05-10T11:59:27+5:30
संगमनेर : तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील ६८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण होवून गुरूवारी (७ मे) त्याचा मृत्यू झाला होता. ...
संगमनेर : तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील ६८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण होवून गुरूवारी (७ मे) त्याचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या या गावातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शहरातील कुरण रस्ता येथील एका महिलेस देखील कोरोनाची लागण झाली आहे. धांदरफळ बुद्रूक मधील १ हजार ६२९ ग्रामस्थांची दैनंदिन तपासणी सुरू झाली आहे. संगमनेर तालुक्यात शुक्रवारी (८ मे) एकाच दिवशी कोरोना बाधित सात रूग्ण आढळून आल्याने १४ दिवस २२ मे पर्यंत काही भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित केला आहे.
धांदरफळ बु्रदूक ग्रामपंचायतीला प्रशासनाने सूचना दिल्यानंतर गावठाण क्षेत्र पूर्णपणे केले आहे. गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गावठाणात ३२३ घरे असून लोकसंख्या १ हजार ६२९ इतकी आहे. हा परिसर पूर्णपणे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला. अत्यावश्यक कारणांशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत. संगमनेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांमार्फत ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा ग्रामस्थांना करण्यात येतो आहे. तालुका आरोग्य विभागाच्यावतीने गावठाणातील प्रत्येक व्यक्तीची दररोज आरोग्य तपासणी होणार आहे. कोरोनाची लागण होवून मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ३६ जणांना जिल्हा रूग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत प्राप्त अहवालात सहा जणांना कोरोनाची लागण झाली असून यात २८ वर्षीय महिला तर पाच वर्षीय बालकांचा देखील समावेश आहे. अद्यापही काही जणांचे अहवाल येण बाकी आहे.
तपासणीसाठी दहा पथके कार्यरत
१ हजार ६२९ ग्रामस्थांच्या दैनंदिन तपासणीसाठी दहा जणांचे पथक कार्यरत आहेत. रोज १४ दिवस दररोज तपासणी केली जाणार आहे. वैद्यकिय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, आशा, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सहायक यांची पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. यातील कुणीलाही कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. नागरिकांनी तपासणीसाठी आरोग्य पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी केले आहे.