ढोकेश्वर मंदिर पांडवकालीन स्थापत्य कलेचा चमत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:29+5:302021-08-25T04:26:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्राचीन व पुरातन ...

Dhokeshwar temple is a miracle of Pandava architecture | ढोकेश्वर मंदिर पांडवकालीन स्थापत्य कलेचा चमत्कार

ढोकेश्वर मंदिर पांडवकालीन स्थापत्य कलेचा चमत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्राचीन व पुरातन देवस्थान श्री ढोकेश्वरची यात्रा तिसऱ्या सोमवारी २३ ऑगस्ट रोजी होती; परंतु कोविडच्या संकटामुळे यंदा ही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यात्रेची गेल्या १०० वर्षांची परंपरा खंडित झाली.

श्री ढोकेश्वरची पुरातन लेणी अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असून इ. स. पूर्व ५५० ते ६०० या कालखंडात ही लेणी तयार झाली असल्याचे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. हे मंदिर पुरातन देवस्थान असल्याने येथे नगर व पुणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. विशेषतः श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी शिवभक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. सोमवारी दुपारी तीन वाजता यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा आखाडा भरत असतो. या आखाड्यात नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील मल्ल मोठ्या संख्येने हजेरी लावतात. ढोकेश्वरच्या नावाने ओळखला जाणारा हा डोंगर पांडवांनी ५५० ते ६०० या कालखंडात कोरल्याचे संशोधकांचे मत आहे. समुद्र सपाटीपासून अंदाजे १ कि.मी उंचीवर डोंगराच्या मध्यभागी पांडवकाळात ही लेणी कोरण्यात आली आहे. ही लेणी स्थापत्यशास्राचा चमत्कारच आहे. अवघ्या चार स्तंभावर अख्खा डोंगर आजही पेलला आहे. प्रत्येक स्तंभावरील कोरीव काम व सुबक नक्षी पाहणाऱ्यांना अचंबित करते. गाभाऱ्यात महादेवाची मोठी पिंड आहे. प्रवेशद्वारावर जय विजयच्या मूर्ती दिमाखात आहेत. सर्वच देवतांच्या मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला शनीची मूर्ती आहे. दक्षिणेकडील भिंतीवर श्रीगणेशाची व इतर देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या असून, खालच्या बाजूला देवदेवतांची वाहने कोरलेली आहेत. या कोरीव कामाला पौराणिक संदर्भ आहे. शिवभक्ती म्हणून नागदेवता मंदिराच्या उत्तरेला कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभागृहावर अत्यंत देखणे व जाळीदार नक्षीकाम कोरलेले आहे.

महादेवाच्या पिंडीमागे यू आकाराची गुहा आहे. या गुहेतूनच भाविक ढोकेश्वराला हरहर महादेव या जयघोषात प्रदक्षिणा पूर्ण करतात. गाभाऱ्याच्या उत्तरेला भला मोठा नंदी असून, पूर्वेला समोरच नंदी आहे.

----------

पर्यंटकांसाठी पर्वणी

मंदिराच्या बाहेर ईशान्य बाजूला भव्य दीपमाळ असून, ती नेहमी तेवत असते. मंदिरावरील पाणी नैसर्गिकरीत्या पावसाळ्यामध्ये टाक्यात साठवण्याची अफलातून कल्पना या वास्तुशास्रात आहे. उंच डोंगरावर कोरलेल्या या मंदिरामध्ये पाण्याच्या टाकीच्या वरच्या बाजूला सीतेची नान्ही आहे, असे भक्तांचे म्हणणे आहे. सामाजिक वन विभागाने या ठिकाणी लहान मुलांसाठी केलेले खेळणी घर बालकांचे आकर्षण बनले आहे. अनेक शालेय सहलींचे ते आकर्षण ठरले आहे.

--------

फोटो ओळी - पानावर

पांडवकालीन स्थापत्यकलेचा नमुना ढोकेश्वरचे श्री ढोकेश्वर मंदिर.

Web Title: Dhokeshwar temple is a miracle of Pandava architecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.