धुळवडीचा राजकीय काव्यजागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 01:13 PM2020-03-13T13:13:13+5:302020-03-13T13:13:44+5:30
धुळवडीनिमित्त नगर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी काव्यजागर सादर करत कवितांचा बार उडविला. या काल्पनिक काव्यजागराची ही मैफल. बुरा न मानो होली है...
होळी-रंगपंचमी विशेष/सुधीर लंके
धुळवडीनिमित्त नगर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी काव्यजागर सादर करत कवितांचा बार उडविला. या काल्पनिक काव्यजागराची ही मैफल. बुरा न मानो होली है...
होळीनिमित्त सालाबादप्रमाणे नगरची सर्व नेतेमंडळी एकत्र जमली होती. मात्र, यावर्षीच्या होळीउत्सवाच्या निमंत्रण पत्रिका पाठवितानाच एक अट टाकण्यात आली होती. यावेळी कुणीही राजकीय भाषणे करायची नाहीत. आपल्या भावना काव्यातून व्यक्त करायच्या. रामदास आठवले सध्या कवितांमुळे भलतेच भाव खात आहेत. नगर जिल्ह्यातून लहू कानडे हे साहित्यिक आमदार झाले आहेत. तेही कवी आहेत. कवी लोकांचे राजकीय क्षेत्रात आक्रमण थोपवायचे असेल तर आपणाला आता कविता केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सर्व नेत्यांनी अगोदरच ठरवून होळीनिमित्त ‘काव्यरंग’ हा कार्यक्रम निश्चित केला होता.
यावेळच्या महोत्सवाचे स्थळ बु-हाणनगरहून खासदार सुजय विखे यांनी विळद घाटात हलविले. कुठलाही नेता आला की शिवाजी कर्डिले हे त्याला जेवणाच्या निमित्ताने हायजॅक करतात. त्यामुळे विखेंनी ही खेळी खेळली. काव्यरंगसाठी सगळे आमदार, नेते जमले. बाळासाहेब थोरात,राधाकृष्ण विखे, यशवंतराव गडाख यांचे सर्वात शेवटी आगमन झाले. थोरातही विखे यांच्या विळद घाटात आले हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रमुख नेते येईपर्यंत आमदार रंगात माखून गेले होते.
काव्यरंगला सुरुवात झाली. अध्यक्ष कोणाला करायचे? हा पेच होता. त्यावर कर्डिले यांनी तोडगा काढला. ते म्हणाले, यशवंतरावांचा ‘सहवास’आपणा सगळ्यांना कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत हवा आहे. मध्येच ते ‘अर्धविराम’ घेऊन कार्यक्रम सोडून गेले तर काय करणार? त्यामुळे त्यांनाच अध्यक्ष करा. तसाही त्यांचा सध्या राजकीय पक्षांमध्ये जीव रमत नाही. निदान यानिमित्ताने ते आपल्यात रमतील.
कर्डिले यांच्या या कोटीवर खळखळून हशा पिकला. यशवंतरावही गालातल्या गालात हसले.शंकरराव गडाख यांनाही हसू आवरता आले नाही. अध्यक्षपदाचा स्वीकार करताना ते म्हणाले, शिवाजीरावांना कच्चे समजू नका. त्यांनी सुरुवातच नामदेव ढसाळांच्या ‘सत्तेत जीव रमत नाही’ या कवितेने केली आहे. त्यामुळे ते आज नुसता बार उडविणार असे दिसतेय. त्यावर कर्डिले लगेच उत्तरले ‘मी कसला कवी, मी तर दूधवाला’.
अखेर कार्यक्रम सुरु झाला. प्रस्तावनेची जबाबदारी थोरातांवर होती. त्यांनी सुरुवात केली.
ते म्हणाले, मला कविता करण्याची गरज नाही. लोकच माझ्यावर कविता करतात. ‘ये बंदा लई जोरात, बाळासाहेब थोरात’ हे गाणे तुम्ही ऐकले असेलच. म्हणून आपण ठरवलंय की आता जोरात वागायचं. त्यांनी आपले काव्यवाचन सुरु केले.
इकडे तिकडे कटाक्ष टाकत ते म्हणाले,
ये बदनाम हुए, कमळाबाई के लिए
हम झंडुबाम हुए शिवसेना के लिए
ते एकाच वेळी मधुकर पिचड व राधाकृष्ण विखे यांच्याकडे पाहत होते. ‘कमळाबाई’ची ही कोपरखळी सर्वांच्या ध्यानात आली. ते खाली बसतात तोच अरुण जगताप उभे राहिले. ‘मला लवकर जायचे आहे. त्यामुळे मी अगोदर उरकतो’ असे सांगत त्यांनी माईकचा ताबा घेतला. त्यांच्या हातात रंगाऐवजी आयुर्वेदिक औषधांच्या बाटल्या होत्या. काही आमदार म्हणाले, ‘काका तुम्ही हा आयुर्वेदाचा प्रचार विधिमंडळात का करत नाहीत? तिकडे तर आपली भेटच व्हायला तयार नाही. नुसतेच स्मितहास्य करत त्यांनी काव्यवाचनाला सुरुवात केली. ते म्हणाले ‘माझे वडील वारकरी होते. त्यामुळे आमच्या सर्व कुटुंबावर तेच संस्कार आहेत. हरिपाठ, भजने हेच आमचे जगणे आहे. त्यामुळे विधिमंडळापेक्षाही मला सतत लोकांच्या सेवेत राहणे आवडते.’
हरी मुखे म्हणा,
हरी मुखे म्हणा
आमदारकीची पर्वा कोण करी,
विधिमंडळाच्या द्वारी
उभा क्षणभरी
आयुर्वेदाने प्रश्नमुक्ती साधियेल्या
असा हरिपाठच त्यांनी सादर केला. विधिमंडळापेक्षा आयुर्वेद कॅम्पसवरील त्यांचे प्रेम पाहून आमदार थकीत झाले.
पुढे तरुण आमदार निलेश लंके व्यासपीठावर आले. त्यांनी सुरुवात केली,
ये नेता, ओ नेता
सब नेताओंका मेला
ओ थे डाटनेवाला
मैं गले लगानेवाला
त्यांनी या कवितेतून पारनेरच्या आपल्या विरोधकांवर अलगद ‘बाण’ साधला होता. पुढील काव्यवाचनासाठी संग्राम जगताप यांची घोषणा झाली. ती घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी ‘नाचू द्या मला, घुमू द्या मला
बघू द्या सारा गाव’
हे गाणे डिजेवर वाजवायला सुरुवात केली. त्यामुळे सगळेच आमदार चक्रावून गेले. अखेर संग्राम जगताप यांनी माईकवर येत ते थांबविले. ‘याठिकाणी डिजे नाही कविता सादरीकरण आहे’, अशी आठवण त्यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली. कविता इंग्रजीत सादर करायची की मराठीत? असा प्रश्न त्यांनी सुजय यांच्याकडे पाहत केला. त्यावर खालून मराठी, मराठी असा गजर झाला.
संग्राम जगताप खाली उतरताच भगवी शाल गळ्याभोवती लपेटत किरण लहामटे मंचावर आले.
जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादीच्या
असा मी, असा मी
कोकणकडा मी, हरिश्चंद्राचा वारस मी
शाल माझी, मी तिचा
जिल्ह्याच्या मावळतीचा
मतदारसंघ माझा
आमदार आशुतोष काळे खास कवितांची डायरीच घेऊन आले होते. त्यांनी कविता सुरु केली,
आनंदी आनंद गडे
जिकडे तिकडे चोहिकडे
मला आमदारकी मिळाली गडे
सासूबाई नामदार गडे
पुढचा क्रमांक प्राजक्त तनपुरे यांचा होता. ते भलतेच खूश होते.
किती सांगू मी सांगू कुणाला
गुलाल घेतला मी या खेपेला
सुजय दादा माझ्या मदतीला
ंंंंंनका सांगू हो सांगू कुणाला
तनपुरेंची कविता संपताच कर्डिले यांनी सुजय विखे यांच्याकडे कटाक्ष टाकला. हळूच राम शिंदे यांच्या कानात पुटपुटले. नंतर बबनराव पाचपुते उठले. कर्डिले यांचा पराभव का झाला हे या कवितेतून स्पष्टच झाले आहे. ही कविता शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवावी असे सांगत त्यांनी आपली कविता सुरु केली-
कमळ घेऊन हातात
विजयी झालो यंदा
फडणविसांची सत्ता गेली
पुन्हा तोट्याचाच धंदा
आता रोहित पवार मैदानात आले. त्यांचे काव्य वाचन सुरु होण्यापूर्वीच त्यांची सोशल मीडियाची टीम आॅनलाईन टपून बसली होती. त्यांची कविता सुरु होण्यापूर्वीच ‘दादा, दादा’ म्हणून लाईकही महाराष्टÑभर सुरु झाल्या. त्यांनी कविता सुरु केली.
‘आज सकाळी तिकडे होतो,
दुपारी त्या पलीकडे होतो
दादांचे मार्गदर्शन ऐकले
पवार साहेबांचे आशीर्वाद घेतले
आज हे केले, उद्या ते करीन
सतत मतदारसंघाची
आॅनलाईन सेवा करीन
त्यांच्या या कवितेवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. त्यानंतर शिवाजी कर्डिले उठले. ते म्हणाले, सगळे काव्यप्रकार दिसले. पण, लावणी कुणीच सादर केली नाही. एका अर्थाने लावणीवर सर्वांनी अन्याय केला.
त्यांनी लावणीतून आपले दु:ख मांडले-
याठिकाणी, त्याठिकाणी
फिरु मी किती
तुम्हा प्रस्थापितांच्या तालावर
नाचू मी किती
नंतर सुजय विखे आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेली कविता त्यांनी सादर केली.
येवोत कितीही राष्ट्रवादी
मी आता थांबणार नाही
सुजय विखे येत आहे
खासदारकी सोडणार नाही
सुजय विखे यांनी भावना व्यक्त केल्यामुळे राधाकृष्ण विखेंनी काव्यवाचन टाळले. ‘जशी सुजयची इच्छा’ एवढेच ते म्हणाले. या सर्व कवितांच्या गदारोळात आमदार मोनिका राजळे, सदाशिव लोखंडे यांनीही काव्यवाचन टाळले. लहू कानडे यांनी मात्र संधी घेतली.
ते म्हणाले, हा कार्यक्रमच तुम्ही माझ्या कवितांपासून प्रेरणा घेऊन आयोजित केला आहे. पण आम्हीही तुमच्यापासून काही प्रेरणा घेतली आहे. ऐका तर-
सखे जेव्हा मार्गच जातो
प्रशासनातून राजकारणाच्या गडबडीकडे
तेव्हा पक्ष, पार्ट्या बदलून
जावेच लागते पुढे
तेव्हा शोधता आला तर शोधायचा असतो एखादा
श्रीरामपूरसारखा मतदारसंघ
अन् सुधारायचा असतो रस्ता
आमदारकीकडून खासदारकीकडे जाणारा
त्यांनी जोरदार वाहवा मिळवली. ब-याचशा आमदारांनी कविता व राजकारण या दोन्ही गोष्टी शिकण्यासाठी त्यांची वेळच मागितली. आता कार्यक्रम समारोपाकडे आला होता.
अध्यक्षीय समारोप यशवंतराव गडाख यांच्याकडे होता. कर्डिले यांनी सुरुवातीलाच त्यांना राजकीय पक्षांबाबत छेडले होते. तो धागा पकडून त्यांनी कविता सुरु केली,
बरे झाले शनिदेवा
जाहलो अपक्ष
दिवा आला अंगणी
असूनी अपक्ष
राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस
सत्ताच सगळी अपक्ष
नांदा सौख्य भरे
अन्यथा उद्धव धरतील
पुन्हा मित्रपक्ष
गडाखांच्या या समारोपाच्या कवितेने हशा, टाळ्या, चिंता अशा सगळ्याच भावना उमटल्या.