कोरोनाकाळातही ५०० अल्पवयीन मुलींची घरातून धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:14 AM2021-06-27T04:14:38+5:302021-06-27T04:14:38+5:30

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासेस बंद असल्याने अल्पवयीन मुले-मुली घरातच होती. त्यामुळे मुलींना फूस लावून ...

Dhoom of 500 minor girls from their homes even during the Corona period | कोरोनाकाळातही ५०० अल्पवयीन मुलींची घरातून धूम

कोरोनाकाळातही ५०० अल्पवयीन मुलींची घरातून धूम

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासेस बंद असल्याने अल्पवयीन मुले-मुली घरातच होती. त्यामुळे मुलींना फूस लावून पळवून नेणे, बाहेर गेलेली मुलगी मिसिंग होणे, प्रेम प्रकरणातून घर सोडणे अशा स्वरूपाच्या घटना मागील दोन वर्षांच्या तुलनेत काहीशा कमी झाल्या आहेत. काही अल्पवयीन मुले-मुलींनी मात्र कोरोनाचीही पर्वा न करता व माता-पित्यांची नजर चुकवून घरातून धूम ठोकली. २०२० या वर्षात जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे अपनयन (पळवून नेणे) केल्याबाबत ३५५, तर मे २०२१ पर्यंत १४५ गुन्हे दाखल आहेत. अशी एकूण ५०० प्रकरणांची नोंद आहे. यातील ४२७ मुलींना पोलिसांनी शोधून काढत पालकांच्या स्वाधीन केले आहे. कोरोनामुळे मुले घरात असली तरी त्यांच्या हातात स्मार्ट फोन असतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुले-मुली सहज एकमेकांच्या सपंर्कात येतात. यातून मैत्री, प्रेम आणि थेट घरातून निघून जाणे अशा स्वरूपाच्या सर्वाधिक घटना समोर आल्या आहेत.

---------------------------

साडेतीन वर्षांत १ हजार १८६ मुलींचा शोध

जिल्ह्यात २०१८ ते मे २०२१ या काळात एकूण १ हजार २८५ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची पोलिसांकडे नोंद आहे. यातील तब्बल १ हजार १८६ मुलींना पोलिसांनी शोधून काढले आहे. सध्या ऑपरेशन मुस्कान सुरू असून, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मसूद खान, हेड कॉन्स्टेबल एस. बी. कांबळे यांचे पथक जिल्हाभरातील पोलिसांशी समन्वय साधून बेपत्ता महिला-पुरुष, अल्पवयीन मुलींचा शोध घेत आहेत.

---------------------

पोलिसांची यशस्वी कामगिरी

एखादी मुलगी घरातून बेपत्ता झाली असेल तर तातडीने पोलिसांना न कळविणे, तक्रारीनंतर नातेवाइकांकडून मुलीबाबत माहिती लपविणे, आदी अडचणी तपासात येतात. त्यामुळे अशा मुलींचा शोध घेताना पोलिसांचा कस लागतो. मात्र, अशाही परिस्थितीत नगर पोलिसांनी अपनयन प्रकरणातील ८५ टक्के प्रकरणे निकाली काढली आहेत.

--------------------

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस अथवा अनैतिक मानवी वाहतूक कक्षामार्फत तातडीने शोध घेतला जातो. त्यामुळे पाेलिसांनी तत्काळ पोलिसांना सर्व माहिती देणे अपेक्षित आहे. सध्या ऑपरेशन मुस्कानअंतर्गत बेपत्ता झालेली मुले-मुली, महिला-पुरुष यांचा शाेध सुरू आहे.

- मसूद खान, पोलीस निरीक्षक, ऑपरेशन मुस्कान

--------------------------

बेपत्ता व मिळालेल्या मुली

२०१८ बेपत्ता- ३८०- मिळाल्या- ३७६

२०१९ बेपत्ता- ४०५- मिळाल्या- ३८३

२०२० बेपत्ता- ३५५- मिळाल्या- ३१६

२०२१ (मे पर्यंत)- बेपत्ता- १४५ मिळाल्या- १११

Web Title: Dhoom of 500 minor girls from their homes even during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.