श्रीगोंदा शहरातील हिरकणींची व्यवसायात गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 03:52 PM2020-08-30T15:52:10+5:302020-08-30T15:54:16+5:30

श्रीगोंदा येथील क्रांतीज्योत लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून कुंभारवाड्यातील मार्गदर्शन बचत गटाला चार लाखांचे अर्थसहाय्य आणि बचतीचा मंत्र मिळाला. या बळावर येथील हिरकणींनी विविध वस्तू बनविण्याच्या व्यवसायात भरारी घेतली. घेतलेल्या रकमेची परतफेड करून दोन लाखांची बचतही केली. याची दखल घेत शासनाने या बचत गटाला अडीच लाखांचे बक्षीस देऊन या हिरकणींचा सन्मान केला.

The diamond business in Shrigonda is booming | श्रीगोंदा शहरातील हिरकणींची व्यवसायात गगनभरारी

श्रीगोंदा शहरातील हिरकणींची व्यवसायात गगनभरारी

बाळासाहेब काकडे । 

श्रीगोंदा : येथील क्रांतीज्योत लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून कुंभारवाड्यातील मार्गदर्शन बचत गटाला चार लाखांचे अर्थसहाय्य आणि बचतीचा मंत्र मिळाला. या बळावर येथील हिरकणींनी विविध वस्तू बनविण्याच्या व्यवसायात भरारी घेतली. घेतलेल्या रकमेची परतफेड करून दोन लाखांची बचतही केली. याची दखल घेत शासनाने या बचत गटाला अडीच लाखांचे बक्षीस देऊन या हिरकणींचा सन्मान केला.

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत श्रीगोंद्यात क्रांतीज्योत लोकसंचलित साधन केंद्राच्या तालुका व्यवस्थापक कांता सुपेकर व शहर व्यवस्थापक प्रतिभा गांधी यांची टीम बचत गटांसाठी काम करते. शहरात ९५ महिला बचत गट असून ४६ गटांना ७० लाखांचे कर्ज वाटप केले आहे. तीन वर्षांपूर्वी कुंभारवाड्यातील दहा महिलांनी मार्गदर्शन महिला बचत गटाचे रोपटे लावले. आयसीआयसीआय बॅँकेकडून चार लाखांचे कर्ज मिळाले.

बचत गटाच्या अध्यक्षा सुमन गोरे, सचिव कांचन गोरे व अमृता गोरे, आशा गोरे, मंदाकिनी गोरे, रंजना श्रीमंदीलकर, रेश्मा गोरे, रूक्मिणी श्रीमंदीलकर, संगीता गोरे, शांताबाई कुंभार आदी सभासद आहेत. अमृता गोरे या बी.कॉम तर आशा गोरे डीएड झालेल्या आहेत.

मातीपासून गणपती मूर्ती, संक्रांतीचे वाण, दिवाळीसाठीच्या लक्ष्मी, पणत्या, दिवे, नवरात्रीसाठी देवीची मूर्ती, बैल पोळ्याला मातीचे बैल, मातीचे माठ अशा विविध वस्तू त्या त्या बनवितात. नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित हिरकणी महोत्सवात महिलांनी बनविलेली मातीची भांडी, वस्तू मुख्य आकर्षण ठरल्या होत्या. 

 आता या बचतगटाची वार्षिक उलाढाल १० लाखांच्यावर गेली आहे. नफ्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या वर्षी या बचत गटाला हिरकणी नवउद्योजक म्हणून आमदार बबनराव पाचपुते व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते तालुकास्तरावरील ५० हजाराचे, तर जिल्हास्तरावरील दोन लाखांचे बक्षीस तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते देण्यात आले. 

येथील महिला बचत गटाने योग्य नियोजन करून स्वत: विविध वस्तू बनविण्याचा महत्त्वापूर्ण निर्णय घेतला. तसेच कामाचे नियोजनही अगदी काटेकोरपणे केले जाते. त्यामुळे कर्जाचे हप्ते नियमितपणे देऊन पैशांची बचतही होत आहे.

इतरांना प्रेरणादायी बचत गट..
कुंभारवाड्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यामातून अर्थसहाय्य मिळाले. यातून त्यांनी व्यवसाय वाढविला. कर्जाची परतफेड वेळेवर चालविली आहे. त्यामुळे मार्गदर्शन बचत गट इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असे क्रांतीज्योत लोकसंचलित साधन केंद्राच्या शहर व्यवस्थापक प्रतिभा गांधी यांनी सांगितले.

पदवीधर असल्याने नोकरी करण्याची इच्छा होती. मात्र नोकरी मिळाली नाही. त्यानंतर आमचा मातीशी संघर्ष सुरू झाला. महिलांनी एकत्र येऊन बचत गट तयार करण्यासाठी प्रतिभा गांधी यांनी प्रोत्साहन देऊन योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. त्यांनी आमच्या बचत गटाला अर्थसहाय्य मिळवून दिले. त्यामुळे आम्ही स्वावलंबी झालो आहोत. 
-आशा गोरे, अमृता गोरे, सदस्या, मार्गदर्शन महिला बचत गट, श्रीगोंदा.

Web Title: The diamond business in Shrigonda is booming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.