मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांत वाढले मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:15 AM2021-06-28T04:15:46+5:302021-06-28T04:15:46+5:30

अहमदनगर : कोरोना महामारीत अनेकांना जीव गमवावा लागला. उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने बहुतांशी जणांचा रोजगार गेल्याने जनजीवन ढवळून निघाले. कोरोनाची ...

Died cheap; Corona in epidemic, then increased deaths in road accidents! | मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांत वाढले मृत्यू !

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांत वाढले मृत्यू !

अहमदनगर : कोरोना महामारीत अनेकांना जीव गमवावा लागला. उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने बहुतांशी जणांचा रोजगार गेल्याने जनजीवन ढवळून निघाले. कोरोनाची लाट शिथिल होताच भरीस भर रस्ते अपघातांतही दुर्दैवाने बहुतांशी जणांचा मृत्यू झाला. गेल्या दीड वर्षातील अपघातांची आकडेवारी पाहता मरण स्वस्त झाले की काय असे वाटू लागले आहे. मागील दीड वर्षात जिल्ह्यात विविध ठिकाणी १ हजार ८१९ अपघात झाले. यात ९१४ जणांचा मृत्यू झाला तर ८३८ जण जखमी झाल्याची वाहतूक विभागात नोंद आहे.

कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षात बहुतांशीकाळ संचारबंदी होती. लॉकडाऊन काळात रस्त्यावर अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणारीच वाहने होती. त्यामुळे या काळात अपघातांचे प्रमाण अपवादात्मक होते; मात्र मागील आणि यावर्षी अनलॉक होताच अपघातांचे प्रमाण वाढले अन् अनेकांना जीव गमवावा लागला. नगर जिल्ह्यातून सहा राज्य व एक राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते तसेच अंतर्गत रस्त्यांवरही वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

-----------------

ही आहेत अपघातांची कारणे

अतिवेगाने वाहन चालविणे

खराब रस्ते

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष

वळणाच्या ठिकाणी ओव्हरटेक करणे

दारु पिऊन वाहन चालविणे

तरुणांमध्ये सुसाट वाहने चालविण्याची क्रेझ

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे

--------------------

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

अपघात वाहनांमध्ये होत असला तरी पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही या अपघातांचा धोका आहे. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनाही धोका असल्याचे समोर आले आहे. पादचाऱ्यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या शहरात सर्वाधिक जास्त घटना घडल्या आहेत.

----------------------

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

बाईक व कार सुसाट चालविण्याची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. हा प्रकार जिवघेणा ठरत आहे. तसेच वाहन चालविताना बहुतांशी तरुण मोबाईलवर बोलताना दिसतात. परिणामी अपघातातील मृतांमध्ये तरुणांची सर्वाधिक संख्या असल्याचे निदर्शनास येत आहे.

-----------------------

या ठिकाणी वाहने हळू चालवा

जिल्ह्यात नगर-औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाट, पांढरीपूल, मनमाड रोडवरील विळद बायपास, नगर-दौंड रस्त्यावरील विसापूर फाटा, पाथर्डी रोडवरील करंजी घाट, कोपरगाव परिसरातील झगडे फाटा, नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाट, नगर-साेलापूर महामार्ग, कल्याण महामार्ग आदी ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. या ब्लॅक स्पॉटवर नियमातच वाहने चालविणे गरजेचे आहे.

----------------

वर्षे अपघात जखमी मृत्यू

२०१९ १६९१ ७९४ ८१९

२०२० १२२५ ५६३ ६११

२०२१ (मे पर्यंत) ६९६ २७५ ३०३

Web Title: Died cheap; Corona in epidemic, then increased deaths in road accidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.