छाप्यात जप्त केलेले डिझेल स्वस्त दरातील ऑईल
By | Published: December 5, 2020 04:39 AM2020-12-05T04:39:57+5:302020-12-05T04:39:57+5:30
लाईट डिझेल ऑईल हे औद्योगिक कारणासाठी वापरले जाते. त्याचा दर डिझेलच्या तुलनेत लिटरमागे पंधरा ते वीस रुपयांनी स्वस्त ...
लाईट डिझेल ऑईल हे औद्योगिक कारणासाठी वापरले जाते. त्याचा दर डिझेलच्या तुलनेत लिटरमागे पंधरा ते वीस रुपयांनी स्वस्त आहे. दरातील तफावतीमुळे हे ऑईल तस्कर काळ्या बाजारातून खरेदी करून आपल्या यंत्रणेमार्फत विक्री करतात. वाहनांसाठी हे ऑईल वापरण्यास परवानगी नाही. तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने शहरातील जीपीओ चौक परिसरात छापा टाकून १ हजार ९३७ लिटर डिझेल जप्त केले होते. या जप्त केलेल्या डिझेलचे नमुने नाशिक येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. या तपासणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. जप्त केलेले हे डिझेल म्हणजेच ‘एलडीओ’ असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. एलडीओची निर्मिती भारतात होत नाही. ते परदेशातून आयात केले जाते. गुजरातमधील बंदर किंवा मुंबईतून ते इतरत्र पोहोचवले जाते. या वाहतुकीसाठी परवाना आवश्यक असतो का, यासंदर्भात पोलीस माहिती घेणार आहेत.
करचुकवेगिरीचा प्रकार
पेट्रोल व डिझेलसाठी आकारला जाणारा ‘जीएसटी’ हा एलडीओच्या जीएसटीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे एलडीओची तस्करी करून हा प्रकार कर चुकवेगिरीचाही असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, या ऑईल तस्करीत आतापर्यंत पोलिसांनी ऑईलची डिझेल म्हणून अवैध विक्री करणारा गौतम बेळगे (भिंगार), जामखेड येथील टँकर चालक व या तस्करीचा मुख्य सूत्रधार राहुरी येथील शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर अशा चौघांना अटक करून चाैकशी केली आहे. या चौकशीत हे ऑईल मुंबई व गुजरात येथून आणले जात असल्याचेही समोर आले आहे, तसेच या रॅकेटमध्ये जिल्ह्यातील आणखी दहा ते बारा जणांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके करीत आहेत.