करंजी घाटात डिझेलचा टँकर उलटला; डिझेलचा रस्त्यावर पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 03:38 PM2020-05-17T15:38:45+5:302020-05-17T15:39:25+5:30
मुंबईहुन परभणीकडे डिझेल घेवून जाणारा टँकर नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात अवघड वळणावर उलटला. यामुळे टँकरमधील डिझेलला गळती लागल्याने घाटात डिझेलचा पूर चालला होता. या अपघातात सुदैवाने चालक बचावला. घाटातील रस्ता डिझेलने ओला झाल्याने अनेक मोटारसायकलस्वार घसरून पडले.
करंजी : मुंबईहुन परभणीकडे डिझेल घेवून जाणारा टँकर नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात अवघड वळणावर उलटला. यामुळे टँकरमधील डिझेलला गळती लागल्याने घाटात डिझेलचा पूर चालला होता. या अपघातात सुदैवाने चालक बचावला. घाटातील रस्ता डिझेलने ओला झाल्याने अनेक मोटारसायकलस्वार घसरून पडले.
रविवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मुंबईहुन परभणीकडे डिझेल घेवून टँकर (क्रमांक एम.एच.-४६, बी.बी.-५३२६) चालला होता. नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील अवघड वळणावर हा डिझेलने भरलेला टँकर उलटला. यानंतर टँकरमधील डिझेलचा घाटात पूरच वाहत होता. संपूर्ण रस्ता डिझेलने ओला झाल्याने येणारे-जाणारे मोटारसायकलस्वार घसरून पडले. यात अनेक जण जखमी झाले आहेत. रिलायन्स जे.एफ.के. कंपनीचा हा टँकर होता. टँकरचालक बाळासाहेब गर्जे सुदैवाने अपघातातून बचावला आहे. डिझेलचा टँकर घाटात उलटल्याने समजताच गावातील व परिसरातील लोकांनी मोठमोठे ड्रम घेवून घाटाकडे धाव घेतली. काहींना भरपूर मिळाले तर काही रिकाम्या हाताने परतले.
अपघाताचे वृत्त कळताच महामार्ग पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून सुभाष अकोलकर, वसंत मुखेकर, विवेक मोरे, रमेश भाकरे, संदीप अकोलकर, संतोष खोसे, गणेश शिंदेसह अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांना मदत केली.