केबलसाठी साइडपट्टीऐवजी मधोमध रस्ता खोदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:16+5:302021-03-31T04:21:16+5:30
तालुक्यातील कोकणगाव ते हिरडगावदरम्यान एका खाजगी कंपनीकडून इंटरनेट केबल टाकण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या ताब्यात असणाऱ्या ...
तालुक्यातील कोकणगाव ते हिरडगावदरम्यान एका खाजगी कंपनीकडून इंटरनेट केबल टाकण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या ताब्यात असणाऱ्या रस्त्याच्या साइडपट्टीवरून केबलसाठी खोदकाम अपेक्षित असताना संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या मधोमध केबल टाकले जात आहे. खोदकामामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात रस्ता वापरणे मुश्कील होणार आहे.
रस्त्याचे नुकसान पाहून कोकणगावचे उपसरपंच अजित जामदार आणि ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराला जाब विचारला असता, जिल्हा परिषदेकडे भरपाईची रक्कम भरल्यामुळे केबलसाठी रस्ता खोदणार असल्याचे सांगत काम सुरूच ठेवल्यामुळे जामदार आणि ग्रामस्थांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून काम बंद करण्याचे आदेश दिले. संबंधित कागदपत्रे घेऊन पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.
............
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे संपर्क साधला असता रस्त्याच्या साइडपट्टीवरून केबल टाकण्याच्या सूचना असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याविषयी संबंधित ठेकेदाराला सांगितले तरीही त्याने काम सुरूच ठेवल्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- अजित जामदार, उपसरपंच, ग्रामपंचायत कोकणगाव
३० आढळगाव