शैक्षणिक सुधारणेतील डिजिटल गुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 02:36 PM2019-12-15T14:36:47+5:302019-12-15T14:37:22+5:30
अध्ययन, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी विविध अॅप तयार करणारे सरदवाडी (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे डिजिटल गुरू शिक्षक रवींद्र भापकर यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना नुकताच केंद्र शासनाचा नॅशनल आयसीटी अॅवार्ड जाहीर झाला आहे.
अशोक निमोणकर ।
जामखेड : दिवसेंदिवस शिक्षण पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. हळूहळू शाळेतील फळ्याची जागा स्मार्ट बोर्ड, अॅँड्रॉईड टीव्ही घेत आहे. मुलांच्या हाती पाटीऐवजी टॅब येत आहेत. हे सर्व आशादायक चित्र आहे. अशाच पद्धतीने अध्ययन, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी विविध अॅप तयार करणारे सरदवाडी (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे डिजिटल गुरू शिक्षक रवींद्र भापकर यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना नुकताच केंद्र शासनाचा नॅशनल आयसीटी अॅवार्ड जाहीर झाला आहे. तालुक्याला प्रथमच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
रवींद्र भापकर यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध ई सहित्याची निर्मिती केली आहे. त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी स्वत: शैक्षणिक वेबसाईट तयार केली आहे. या वेबच्या माध्यमातून कथा, कविता, पाठ्यपुस्तके, आॅनलाईन टेस्ट, आॅफलाईन टेस्ट, विविध अॅप्स मोफत डाउनलोड करता येतात. राज्यातील लाखो शिक्षक व विद्यार्थी या वेबचा नियमित वापर करतात. या वेबला ३० लाखाहून अधिक लोकांनी भेटी दिल्या आहेत.
शाळेत ४५ विद्यार्थी असून शाळेचे दोनही वर्ग डिजिटल आहेत. दोनही वर्गात इंटरअॅक्टिव बोर्ड बसवले आहेत. या बोर्डसाठी अमेरिकेतून मदत मिळाली आहे. माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार यांनीही शाळेसाठी इ साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शाळेसाठी लोकसहभागातून लाखो रूपयांची मदत मिळाली. शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ६० शाळांचा विदेशातील अनिवासी भारतियांशी ग्लोबल नगरी व्हिडिओ कॉन्फरंसिंग कार्यक्रमाद्वारा संवाद घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
१०० कार्यशाळांचे आयोजन
भापकर हे देशभर तंत्रस्नेही शिक्षक म्हणून मार्गदर्शन करतात. त्यांनी आतापर्यंत भोपाळ (मध्य प्रदेश), अजमेर (राजस्थान), दिल्ली या ठिकाणी तंत्रज्ञान कार्यशाळेत सहभाग नोंदविला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी जवळपास १०० ठिकाणी तंत्रस्नेही कार्यशाळा घेवून शिक्षकांना तंत्रज्ञानाची गोडी लावली आहे.