गावागावात लागणार डिजिटल नकाशे
By Admin | Published: June 16, 2017 02:34 PM2017-06-16T14:34:14+5:302017-06-16T14:34:14+5:30
प्रत्येक गावचे स्वतंत्ररित्या संगणकीकृत डिजीटल नकाशे, लॅमिनेशन फलक व गुंडाळी प्रत ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दीपक पाटील यांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
शेवगाव, दि़ १६ - शहरासह तालुक्यातील सर्व ११३ गावच्या चतुर्सिमा, हद्द, गट नंबर, सर्वे नंबर , शेतीबांध, रस्ते, नदी, नाले, आदी बाबी ठळकपणे दर्शविणारे प्रत्येक गावचे स्वतंत्ररित्या संगणकीकृत डिजीटल नकाशे, लॅमिनेशन फलक व गुंडाळी प्रत ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दीपक पाटील यांनी दिली.
गावच्या चातुर्सिमा, हद्द व रस्ते, शेती बांध यावरून आपसातील तक्रारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावचे डिजीटल नकाशे, लॅमिनेशन फलक व गुंडाळी प्रत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे गावपातळीवर आपसातील तक्रारीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे. जिल्हाधिकारी अभय महाजन, प्रांताधिकारी विक्रम बादल तसेच तत्कालिन प्रांताधिकारी प्रशांत खेडकर यांच्या पाठपुराव्यानंतर ही योजना शेवगावमध्ये राबविण्यात येणार आहे़ कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांनी ही संकल्पना कोल्हापूरमध्ये राबविली होती़ सांगली येथील मे. गोमटेश कड सर्हिसेस संस्थेचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक गावचे नकाशे व गुंडाळी प्रती उपलब्ध करून दिल्या आहेत़ लवकर त्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे़