नगर-पुणे रेल्वेचा मार्ग मोकळा : दिलीप गांधी यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:59 AM2018-10-27T10:59:17+5:302018-10-27T10:59:22+5:30
नगरसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नगर-पुणे रेल्वे मार्गाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून, हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले़
अहमदनगर : नगरसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नगर-पुणे रेल्वे मार्गाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून, हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले.
नगर-पुणे रेल्वेच्या कॉड लाईनचे सुरू असलेल्या कामाबाबत गांधी यांनी शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, इंदापूरचे प्रांताधिकारी संजय अस्वले, रेल्वे बोर्डाचे प्रतिनिधी आर.एन.गुप्ता व दौंड येथील तहसीलदार आदी उपस्थित होते.
नगर-पुणे रेल्वेच्या कॉड लाईनच्या कामासाठी आतापर्यंत जवळपास ९० टक्के जमिनींचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादनासाठी ज्या शेतक-यांच्या अडचणी आणि तक्रारी होत्या त्यांच्यासमवेतही यावेळी यशस्वी चर्चा करून तोडगा काढण्यात आला. त्यामुळे आता लवकरच कॉड लाईनचे सुरु असलेले काम पूर्ण होणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. रेल्वेच्या या मार्र्गामुळे नगरकरांचा पुण्याचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. दीड ते दोन तासात पुण्याला जाणे शक्य होणार असून, यामुळे वेळ व पैशाचीही बचत होणार आहे़ नगर-पुणे अशी रेल्वे सुरू झाल्यानंतर नगर-पुणे महामार्गावरील रहदारीवरही परिणाम होऊन अपघातांचे प्रमाण कमी होणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.
दौंडचा वळसा टळणार
नगर-पुणे असा रेल्वे मार्ग नसल्याने नगरच्या प्रवाशांना दौंडमार्गे जाणा-या रेल्वेतून पुणे येथे जावे लागत होते. रेल्वेचा दौंडमार्गे हा प्रवास पाच ते सहा तासांचा होता. आता नगर- काष्टी (ता. श्रीगोंदा) - पुणे असा रेल्वे मार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम मार्गी लागल्यानंतर नगरकरांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.