दिलीप गांधी यांना केंद्रीय मंत्रीपदाचे वेध!
By Admin | Published: May 18, 2014 12:09 AM2014-05-18T00:09:21+5:302024-03-20T11:00:53+5:30
अहमदनगर : दोन लाख मतांच्या फरकाने निवडून येत विजयाची हॅटट्रिक साधणारे खासदार दिलीप गांधी यांना आता केंद्रीय मंत्रीपदाचे वेध लागले आहेत.
अहमदनगर : दोन लाख मतांच्या फरकाने निवडून येत विजयाची हॅटट्रिक साधणारे खासदार दिलीप गांधी यांना आता केंद्रीय मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. विजयी मिरवणूक घेऊन विश्रांती घेत असतानाच त्यांना दिल्लीचे बोलावणे आले आणि शनिवारी पहाटेच ते दिल्लीकडे रवाना झाले. सायंकाळी ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी झाले होते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून दोन लाख नऊ हजारांचे मताधिक्क्य घेत गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव राजळे यांचा दारुण पराभव केला. विजयाचे प्रमाणपत्र मिळविल्यानंतर गांधी यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, अरुण जेटली, श्याम जाजू यांना विजयाची दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यांनी गांधी यांना लगेच दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले. गांधी तिसर्यांदा नगरचे खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. मोदी यांच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला चार कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाचपैकी एक पद गांधी यांना मिळेल, अशी शक्यता आहे. त्यामुळेच गांधी यांना दिल्लीला निमंत्रण दिल्याचे सांगितले जात आहे. खासदार गांधी यांच्याशी शनिवारी सायंकाळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत होते, त्यामुळे त्यांचाशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी) खासदार दिलीप गांधी हे १९९९ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात ते जहाज बांधणी मंत्रालयात राज्यमंत्री होते. वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात खासदार बाळासाहेब विखे यांच्यानंतर मंत्रीपद मिळालेले गांधी हे दुसरे खासदार होते. माजी खासदार बबनराव ढाकणे हे ही केंद्रीय मंत्री मंडळात ऊर्जा राज्यमंत्री होते. मात्र त्यांनी बीड मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. कोपरगाव मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार अण्णासाहेब शिंदे हे १९६२ ते १९७७ अशी पंधरा वर्षे केंद्रीय कृषी राज्यमंत्री व कृषी उपमंत्री म्हणून केंद्र सरकारमध्ये होते. १९९९ च्या सरकारनंतर जिल्ह्याच्या वाट्याला अद्यापपर्यंत एकही केंद्रीय मंत्रीपद लाभले नाही.