पक्षभेद विसरून विखे-थोरात यांनी मदत केली : पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 07:07 PM2019-01-09T19:07:57+5:302019-01-09T19:09:24+5:30
विधानसभेत आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेले, त्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मोठी मदत केली. ‘सेल्फी प्रकरणा’वरून टीका झाल्यानंतर थोरात यांनी पक्षभेद विसरून आपली पाठराखण केली होती, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
संगमनेर : विधानसभेत आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेले, त्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मोठी मदत केली. ‘सेल्फी प्रकरणा’वरून टीका झाल्यानंतर थोरात यांनी पक्षभेद विसरून आपली पाठराखण केली होती, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
संगमनेर तालुक्यातील ओझर येथील खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे होत्या. यावेळी व्यासपीठावर दुग्ध, पशुसंवर्धन व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्षा दुगा तांबे उपस्थित होते.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आयोजित करीत असलेल्या ‘परळी फेस्टिव्हल’वर मुंडे यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, देवाच्या नावाखाली तेथे काय चालते याची सर्वांना माहिती आहे. शुद्धीकरण करण्यासाठी शेवटी इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ठेवले जाते.
ते आपले ‘पाहुणे’
आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्व. विलासराव देशमुख व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजा मुंडे यांच्या कामाचेही कौतुक केले. कार्यक्रमासाठी येताना पशुसंवर्धन मंत्र्यांपुढे शेतकऱ्यांनी दूध अनुदानाचा प्रश्न उपस्थित करण्याची माझ्याकडे मागणी केली. परंतु जानकर हे आज आपले ‘पाहुणे’ असल्याचे थोरात यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
दुधाला अनुदान देणारा पहिला मंत्री...
आमदार थोरात यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जानकर म्हणाले, दूध अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला आहे. अनुदानापोटी तीन दिवसात ९० कोटी रुपये देणारा राज्य, नव्हे तर देशातही मी पहिला मंत्री आहे. उर्वरित अनुदान येत्या आठ दिवसात देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.