शिक्षकांच्या विश्वासामुळेच राजकीय जीवनात दिशा; रोहित पवार यांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:24 PM2020-09-05T12:24:05+5:302020-09-05T12:24:12+5:30
अहमदनगर : कोणत्याही देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा हव्या असतात. परंतु त्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक राजकीय व्यक्तीने हा विकास साधलाच पाहिजे, असे मत आमदार रोहित पवार यांनी शिक्षकदिनी व्यक्त केले.
गुणवडी शिर्सुफळ मतदारसंघातून प्रारंभ
गुणवडी शिर्सुफळ या पुण्यातील जिल्हा परिषद मतदारसंघातून राजकीय जीवनाची सुरूवात केली. सुरूवातीपासूनच शिक्षण या गोष्टींवर आत्मियतेने काम केले. मार्गदर्शक शरद पवार, स्व. अप्पासाहेब पवार, वडील राजेंद्र पवार व आई सुनंदा पवार यांच्या विचारातून शारदा शिक्षण संकुल उभा राहिले. त्यावेळी जि.प.तून शिक्षणासाठी दिलेले योगदान असो की आज कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघात शैक्षणिक क्षेत्रात होणारी क्रांती असो, जीवनातील शिक्षकांविना हे स्वप्न रुजवू शकलो नसतो.
निवृत्तीला आलेले शिक्षक टेक्नॉलॉजीचे चाहते
डिजीटल शाळा, स्मार्ट शाळा यांच्यासंदर्भात मी जेव्हा पाऊल टाकण्यास सुरूवात केली तेव्हा मला अनेकांनी असं सांगितलं की शिक्षक या गोष्टींना विरोध करतील. पण जेव्हा कामास सुरूवात केली तेव्हा सर्वप्रथम याच शिक्षकांनी मला विश्वास दिला. सहा महिन्यांनंतर निवृत्त होणारे शिक्षक देखील उत्सुकतेने टेक्नॉलॉजी शिकू लागले. मला वाटतं, कोणत्याही शिक्षकासाठी मुलांनी मी काय नवीन शिकवू हेच स्वप्न असतं आणि सर्व शिक्षक प्रामाणिकपणे हे काम करत असतात. एखाद्या शिक्षकाची अशी इच्छा नसतेही पण एखाद्या शिक्षकामुळे सर्व शिक्षकांना दोष देणं पूर्णपणे चुकीचे आहे.
शैक्षणिक विकासाचे ध्येय ठेवावे
दुसरीकडे शालेय जीवनात असणारे शिक्षक आजही माझ्या संपर्कात असतात. आपण अनेकदा पायाभूत विकासाच्या गप्पा मारताना लोकांना ऐकतो. पण पायाभूत विकासासाठी आवश्यक असणा-या अनेक गोष्टींपैकी विद्यार्थांचा शैक्षणिक विकास ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सर्वांनी, विशेषत: राजकारण्यांनी त्याचे गांभीर्य ओळखून त्यासाठी काम केले पाहिजे. शिक्षकदिनी हा संकल्प केला तर निश्चितच ती मोठी उपलब्धी ठरेल.
शिक्षकांमुळेच ऊर्जा
एक शिक्षक प्रामाणिक असतो म्हणूनच आपण आयुष्यभर प्रामाणिक राहू शकतो. शालेय जीवनापासून आजतागायत मिळालेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षकांना मनापासून अभिवादन करतोच, पण सोबतच कोरोनाच्या आजच्या या संकटात न थकता, न थांबता मुलांसाठी कोणत्याही माध्यमातून शिक्षण पोहचवण्याची ऊर्जा घेवून लढणाºया प्रत्येक शिक्षकाचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे.
तसा प्रत्येक दिवस आपणाला काहीतरी शिकवून जात असतो. थोडक्यात रोजचाच दिवस शिक्षक दिवस असतो. ज्यातून रोज एक धडा मिळतो.
- आमदार रोहित पवार