संचालकांनी फसविले आभासी पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:23 AM2021-09-26T04:23:24+5:302021-09-26T04:23:24+5:30
अहमदनगर : जिल्हा शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आभासी असल्याने संचालकांनी मनमानी पद्धतीने ...
अहमदनगर : जिल्हा शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आभासी असल्याने संचालकांनी मनमानी पद्धतीने पोटनियम दुरुस्ती करून शिक्षक सभासदांना आभासी पद्धतीने फसवल्याचा आरोप गुरुकुल शिक्षक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन शिंदे, कार्याध्यक्ष सुखदेव मोहिते, सरचिटणीस शिवाजी रायकर, संपर्कनेते संतोष भोपे यांनी केला आहे. मयत निधी मृत सभासदांसाठी असावा, तो निधी इतरत्र वापरू नये, अशी गुरुकुलची पहिल्यापासून भूमिका होती. तिच्याकडे कानाडोळा करून या संचालकांनी तो निधी निलंबित व बडतर्फ शिक्षकांचे कर्ज फेडण्यासाठी वापरला. मयत निधीला पाय फुटल्यामुळे आता संचालक शिक्षकांना नव्याने भुर्दंड देत आहेत. जामीनदारांना तोशीस लागू न देता या कर्जदारांकडून कर्जाची रक्कम वसूल करण्याचे अनेक मार्ग होते. मर्जीतले शिक्षक असल्याने ते वापरले गेले नाहीत. कोरोना काळात मयत शिक्षकांच्या कुटुंबीयांविषयी गुरुकुलच्या मनात आस्था आहे. त्यांना मदत करताना संचालक इतर मार्गाचा वापर करू शकत होते. अशा आपद्कालीन परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने इतर पर्यायांना मान्यता दिली असती. परंतु या संचालकांनी सत्तेवर आल्यापासून डोके न चालवता सभासदांच्या वेतनावर आर्थिक हल्ला करण्याचा सपाटा लावला आहे. आता तर शिक्षकांचा मयत निधीही सुरक्षित नाही. संचालक मंडळ मृत सभासदांना पंधरा लाख रुपयांची मदत करते. परंतु अतिदक्षता विभागात असलेल्या शिक्षकांना मात्र मदत करत नाही. वार्षिक सभेत बोलताना गुरुकुलच्या नेत्यांनी या विसंगतीवर प्रकाश टाकला होता. शिक्षक अतिदक्षता विभागात असतानाच त्याला आर्थिक मदत सुरू करावी. सुदैवाने त्याचे प्राण वाचले तर मदत केलेली रक्कम त्याच्या नावावर कर्जाउ म्हणून टाकावी व दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्यास केलेली मदत पंधरा लाख रुपयांतून वजा करून त्याला पैसे द्यावेत, अशी मागणी गुरुकुल मंडळाने केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करून संचालकांनी शिक्षकांच्या सुरक्षित ठेवींना हात घातला आहे. हे अन्यायकारक आहे. त्यासाठी संचालकांनी प्रत्यक्ष आमसभा बोलवावी व सभासदांची मते ऐकून निर्णय घ्यावा, असे मत बाळासाहेब खेडकर, अशोक कानडे, मिलिंद पोटे, अशोक आगळे, मधु मैड, जालिंदर गोरे, ज्ञानेश्वर बोडखे, सोमनाथ येलमामे, दशरथ पवार, उत्तम गायकवाड, बबन बनकर, अनिल ओहोळ, सचिन झावरे, सुनील धाडगे, संतोष डमाळे, सतीश अंधारे, सीताराम गव्हाने, विलास गोरे यांनी व्यक्त केले आहे.