पारनेरच्या सभापतींवर उद्या अविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:11 PM2018-09-16T13:11:17+5:302018-09-16T13:11:35+5:30
पारनेर बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रशांत गायकवाड यांच्याविरोधात राष्ट्रवादीचेच नेते सुजित झावरे यांच्या समर्थक संचालकांनी अविश्वास ठराव आणण्याची भूमिका घेतली आहे.
पारनेर : पारनेर बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रशांत गायकवाड यांच्याविरोधात राष्ट्रवादीचेच नेते सुजित झावरे यांच्या समर्थक संचालकांनी अविश्वास ठराव आणण्याची भूमिका घेतली आहे. या ठरावावर आमदार विजय औटी यांच्या समर्थक पाच संचालकांनी सह्या करून समर्थन दिले आहे. सोमवारी गायकवाड यांच्यावर पंधरा संचालकांच्या सह्यानिशी अविश्वास ठराव दाखल होणार आहे़
सभापती गायकवाड हे मागील महिन्यात राष्ट्रवादी व काँग्रेसमधील एका गटाच्या सुपा येथील बैठकीला हजर होते़ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यामुळे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या गटाने आठ संचालकांना बरोबर घेऊन गायकवाड यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली़ मात्र मला अजून काम करण्यास संधी हवी आहे, असे म्हणून गायकवाड यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता़ तर कार्यकर्त्यांना संधी म्हणून गायकवाड यांनी राजीनामा द्यावा, असे झावरे यांचे म्हणणे होते़ दरम्यान मी या विषयावर योग्य वेळी बोलेन असे सभापती गायकवाड यांनी सांगितले.
सेनेच्या संचालकांच्याही ठरावावर सह्या
राष्ट्रवादीकडून गायकवाड यांच्याविरोधात आठ सह्या झाल्यानंतर आमदार विजय औटी यांच्याकडेही सेनेच्या संचालकांच्या सह्यांसाठी राष्ट्रवादीने आग्रह धरला़ आमदार औटी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीत सुरू असलेल्या नाराजीनाट्याचा शिवसेनेला होणारा राजकीय फायदा ओळखून सेनेच्या पाचही संचालकांना सह्या करण्यास संमती दिली. त्यानंतर सेनेच्या संचालकांनी शनिवारी अविश्वास ठरावावर सह्या केल्या. अविश्वास ठरावावर राष्ट्रवादीचे आठ, सेनेचे पाच, काँग्रेसचे दोन अशा १५ जणांच्या सह्या आहेत.
गंगाराम बेलकर यांना संधी!
राष्ट्रवादीकडून त्यांच्याच पक्षाचे गायकवाड यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव आणल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते झावरे यांच्या गोटात असलेले माजी पंचायत समिती सभापती गंगाराम बेलकर यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे.