लोकसहभागातून ऑक्सिजन प्लांट निर्मितीच्या चर्चेला पूर्णविराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:52+5:302021-05-09T04:21:52+5:30
कोपरगाव : आमदार आशुतोष काळे हे एक ऑक्सिजन प्लांट उभारणार आहेत त्याची ऑर्डर देखील दिली असून तो उभारल्यानंतर येणाऱ्या ...
कोपरगाव : आमदार आशुतोष काळे हे एक ऑक्सिजन प्लांट उभारणार आहेत त्याची ऑर्डर देखील दिली असून तो उभारल्यानंतर येणाऱ्या काळात ऑक्सिजनची सोय होणार आहे. त्यामुळे सध्या लोकसहभागातून ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या विषयाला पूर्णविराम मिळाला असल्याचे कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.
वहाडणे म्हणाले, शहरात लोकसहभागातून एक ऑक्सिजन प्लांट ग्रामीण रुग्णालयात बसविण्याबाबत चर्चा करण्यासाठी सहविचार सभा नुकतीच कोपरगाव नगरपरिषदेत पार पडली होती. ऑक्सिजनचा झालेला प्रचंड तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असेच सर्वांनी यावेळी मत मांडले होते. कारण ऑक्सिजन अभावी होत असलेले मृत्यू रोखणे महत्त्वाचे आहे. ५० ते ६० लाख गुंतवणूक करून ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी आर्थिक भार उचलण्याचे अनेकांनी मान्य केले. पण त्यानंतर शहरातील उद्योजक अरविंद भन्साळी, राजेश ठोळे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी अनेक राज्यातील ऑक्सिजन प्लांट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क केला. मात्र, अजून किमान चार महिने तरी ऑक्सिजन प्लांट उभारून देता येणार नाही, कारण सर्व देशभरातून अशा प्लांटला प्रचंड मागणी आहे असेच सांगण्यात आले.