ई-टपाल प्रणालीद्वारे साडेसहा हजार पार्सपोर्ट प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:14 AM2021-06-27T04:14:39+5:302021-06-27T04:14:39+5:30
अहमदनगर : पोलीस दलात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-टपाल प्रणालीद्वारे २१ दिवसांच्या आत ६ हजार ७५४ पासपोर्ट प्रकरणांचा निपटारा ...
अहमदनगर : पोलीस दलात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-टपाल प्रणालीद्वारे २१ दिवसांच्या आत ६ हजार ७५४ पासपोर्ट प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, चारित्र्य पडताळणी, शस्त्र परवाना यासह विविध प्रकरणेही आता प्रलंबित न राहता तत्काळ मार्गी लागत असल्याने पोलिसी कामातील दप्तरदिरंगाई आता संपणार आहे.
पोलीस स्टेशन स्तरावर बहुतांशी प्रकरणे प्रलंबित राहत होती. सर्व प्रकरणे वेळेत मार्गी लावण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपविभागनिहाय बैठका घेऊन प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. यामध्ये ई-टपल प्रणाली महत्त्वपूर्ण ठरली आहे. १ ऑक्टोबर २०२० पासून पासपोर्टची ६ हजार ८१४ प्रकरणे जिल्हा विशेष शाखेकडे प्राप्त झाली होती. यातील ६ हजार ७५४ पासपोर्ट प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ऑफलाइन चारित्र्य पडताळणीची ३२७ प्रकरणे प्राप्त झाली होती. यातील २७४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. ऑनलाइन चारित्र्य पडताळणीच्या ९ हजार ८०० पैकी ९ हजार ७४१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. शस्त्रपरवाना ६०४, अनुज्ञप्तीचे ११६, पेट्रोल पंपांचे ६८, स्फोटकसंदर्भातील ६४ आदी प्रकरणे वेळेत मार्गी लावण्यात आली असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखेचे उपाअधीक्षक व जिल्हा विशेष शाखेतील अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
..........................
पोलीस दलास केंद्राकडून मिळणार महसूल
२१ दिवसांच्या आत पासपोर्ट प्रकरणांचा निपटारा केल्यास एका प्रकरणाकरिता १५० रुपये पासपोर्ट विभागाकडून पोलीस विभागास दिले जातात. नगर जिल्ह्यात ई-टपाल प्रणालीच्या माध्यमातून ६ हजार ७५४ पासपोर्ट प्रकरणांचा २१ दिवसांच्या आत निपटारा केल्यामुळे केंद्र शासनाच्या पासपोर्ट विभागाकडून पोलीस दलास संभाव्य ९ लाख ४५ हजार ४०० रुपयांचा महसूल मिळणार आहे.