जागेच्या वादाने सुप्याची पाणी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:19 AM2021-03-19T04:19:29+5:302021-03-19T04:19:29+5:30

सुपा : सुपा (ता.पारनेर) येथील १४ कोटी ३१ लाख रूपये खर्चाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे काम रखडले आहे. तीन ...

The dispute over space hampered Supya's water plan | जागेच्या वादाने सुप्याची पाणी योजना रखडली

जागेच्या वादाने सुप्याची पाणी योजना रखडली

सुपा : सुपा (ता.पारनेर) येथील १४ कोटी ३१ लाख रूपये खर्चाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे काम रखडले आहे. तीन ठिकाणच्या जागेचा प्रश्न उद्भवल्याने ही योजना निर्धारित वेळेत पूर्णत्वास जाण्याची शक्यता धूसर होऊ लागली आहे.

ऑक्टोबर २०१९ मध्ये सुप्याच्या कायमस्वरूपी पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामाची पूर्णत्वाची मुदत होती. कोरोनामुळे मुदत वाढ प्राप्त झाल्याने ३१ मार्च २०२१ अखेर ही योजना कार्यान्वित करणे अपेक्षित आहे.

अंतिम टप्प्यात आलेल्या या योजनेच्या कामाला जागेच्या अडचणींचा विळखा बसला व कामाची गती मंदावली. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत सदस्यांची मुदत संपली. प्रशासकाच्या हाती कारभार व नंतर निवडणुका झाल्या. राजकीय डावपेचात झालेल्या बदलाने सत्तांतर होऊन पदाधिकारी निवड झाली. आता सत्तास्थानी असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांच्यापुढे पवारवाडी, कोल्हे वस्ती पाणी साठवण टाकी व जलशुद्धिकरण केंद्राच्या जागेचा तिढा सोडविण्याची जबाबदारी आल्याने ते आता हा प्रश्न कधी व कसा सोडवणार यावर या पाणीयोजनेचे भवितव्य अवलंबून आहे.

जलशुद्धिकरण केंद्राचे ८० टक्के काम पूर्ण झाल्यावर हे काम अतिक्रमित जागेवर झाल्याचा दावा करीत ते बंद पाडण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता सतीश बढे यांनी सांगितली.

ही योजना विसापूर जलाशयातून राबवण्यात आली. त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून १४ कोटी ३१ लाख रूपये खर्चाची योजना मंजूर करण्यात आली. विसापूर ते सुपा दरम्यान रांजणगाव रस्ता, पिंपरी गवळी, गणेशवाडी, वाळवणे या गावातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले. कामाची गती वाढली त्यांनी शेतजमिनीतून खोदकाम करण्यासाठी संबंधित ठेकेदारास संमती दिली. या योजनेतून प्रति माणशी ५५ लिटर पाणी दररोज उपलब्ध होणार असून तेही स्वच्छ व शुद्ध असणार असल्याने गावकऱ्यांची कायमस्वरूपी तहान भागवली जाणार आहे.

त्या दृष्टीने आखण्यात आलेली ही योजना महत्वपूर्ण आहे. त्यासाठी असणाऱ्या ८ साठवण टाक्यांपैकी ६ टाक्यांची कामे पूर्णत्वास आली असून दोन टाक्या रखडल्याचे बढे यांनी सांगितले. पाईपलाईनच्या राहिलेल्या गॅपबाबत संबंधित ग्रामस्थ व शेतकरी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. येत्या १५ ते २० दिवसात या गॅपचे काम पूर्ण केले जाईल, असे शाखा अभियंत्यांनी सांगितले. जागेचा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांना जबाबदारीने सोडवावा लागेल.

----

सुप्यातील विसापूर पाणी पुरवठा योजनेच्या कामातील जागेचा प्रश्न संबंधितांना बोलावून स्थानिकांशी चर्चा करून सर्वांच्या सहकार्यातून सोडवू. रखडलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जातील.

-मनीषा रोकडे

सरपंच, सुपा

Web Title: The dispute over space hampered Supya's water plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.