अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनास शिक्षण विभागाची टाळाटाळ; नगर जिल्ह्यात शिक्षकांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 07:32 PM2018-01-23T19:32:58+5:302018-01-23T19:36:49+5:30
अहमदनगर जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन करण्यास शिक्षण विभागाकडून टाळाळ सुरू असून, येत्या दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश ग्रामविकास खात्याने दिला आहे.
अहमदनगर: जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन करण्यास शिक्षण विभागाकडून टाळाळ सुरू असून, येत्या दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश ग्रामविकास खात्याने दिला आहे. पुढील दोन दिवसांत समायोजन करून अहवाल ग्रामविकास कार्यालयास सादर केला जाणार आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा आदेश दिला आहे. जिल्हांतर्गत बदल्यांपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला शिक्षकांचे समायोजन करण्याचा आदेश दिला आहे. परंतु, जिल्हा परिषदेने समायोजनाची प्रक्रिया अद्याप सुरूच केलेली नाही. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाचे सचिव प्रि. श. कांबळे यांनी नाराजी व्यक्त करत येत्या दोन दिवसांत समायोजन करण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया मुदतीत पूर्ण केली जाणार आहे. मात्र समायोजनाची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून संच मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया खोळंबली असल्याने ग्रामविकास खात्याने नाराजी व्यक्त केली आहे. शाळेतील विद्यार्थी संख्या, मंजूर शिक्षकांची पदे, अतिरिक्त शिक्षक,यासारखी माहिती आॅनलाईन भरणे बंधनकारक होते. मात्र शिक्षकांनी आॅनलाईन भरली नाही. त्यामुळे केंद्रप्रमुखांना माहिती उपलब्ध झाली नाही. परिणामी तालुक्यांच्या गटशिक्षण अधिका-यांना समायोजन करणे शक्य झाले नाही. जिल्ह्यातील १ जानेवारी २०१८ नुसार पटसंख्या संकेतस्थळावर भरणे आवश्यक असून, त्यानंतरच शिक्षण विभागाकडून संच मान्यता मिळणार आहे.
शिक्षण विभागाचे वाभाडे
शिक्षण विभागाच्या कारभारावर पदाधिका-यांकडून नेहमीच नाराजी व्यक्त केली जाते. मात्र दस्तुर खुद्द ग्राविकास खात्याच्या सचिवांनीच नाराजी व्यक्त केली आहे. आदेशाचीही अंमलबजावणी शिक्षण विभागाकडून होत नसल्याने केंद्रप्रमुखांची दोन वेतनवाढी रोखण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागातील आवमेळ चव्हाट्यावर आला आहे.