सीईटी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:33+5:302021-08-25T04:26:33+5:30
कोपरगाव : दहावी आणि बारावीचे गेल्या महिन्यात निकाल जाहीर झाले आहेत. परीक्षा रद्द झाल्याने अंतर्गत मूल्यमापन, तोंडी, प्रात्यक्षिक आदींच्या ...
कोपरगाव : दहावी आणि बारावीचे गेल्या महिन्यात निकाल जाहीर झाले आहेत. परीक्षा रद्द झाल्याने अंतर्गत मूल्यमापन, तोंडी, प्रात्यक्षिक आदींच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाविषयी विद्यार्थी समाधानी आहेत. त्यात अकरावीची सीईटी परीक्षा रद्द झाल्याने काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यंदा जिल्ह्याचा दहावीचा ९९.९७, तर बारावीचा ९९.७८ इतका निकाल लागला आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये पूर्णतः बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे पाढे गिरविण्याचे काम सुरू आहे. या शिक्षण पद्धतीने दहावी बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या हेतूने चांगलाच अभ्यास केला होता. मात्र, दुसऱ्या लाटेने चांगलेच डोके वर काढल्याने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यानंतर दहावी, बारावीचा परीक्षा न घेता वार्षिक अंतर्गत मूल्यमापनानुसार निकाल लागला आहे. या निकालात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे; परंतु अशा पद्धतीने निकाल लागल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ठेवली होती. त्यातून अनेक हुशार विद्यार्थ्यांना या परीक्षेतून आपली प्रत्यक्षात गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी होती; परंतु त्याही परीक्षेला स्थगिती आल्याने अनेक विद्यार्थ्यांचा, तसेच पालकांचा हिरमोड झाला आहे.
........
दहावी परीक्षेला बसलेले विद्यार्थी - ७०५८५
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ७०,५६६
बारावी परीक्षेला बसलेले विद्यार्थी - ६१,९२१
बारावी उत्तीर्ण विधार्थी - ६१,७८७
दहावीचा निकाल - ९९.९७ ( टक्के )
बारावीचा निकाल - ९९.७८ ( टक्के )
............
कोरोनामुळे परीक्षा झाल्या नाहीत यात काय आमचा दोष ?
वर्षभर डोळ्यांना त्रास होत असतानाही ऑनलाइन तासिकांचा अभ्यास केला. ज्यावेळी शाळा उघडल्या त्यावेळी कोरोनाची भीती बाळगून गुदमरायला लावणारा मास्क लावून शाळेत गेलो. सॅनिटायझर लावून-लावून हाताचे कातडे निघाले. दहावीचा अभ्यास इतर मुलांप्रमाणे आम्हीही दिवसरात्र केला. आई-वडिलांचा आनंद बघायचा होता. त्यामुळे या परीक्षेत ९७.४० टक्के मिळून पहिला क्रमांक आल्याने माझ्यासह माझे पालक समाधानी आहोत.
-श्रुती वरकड, विद्यार्थिनी, वारी, ता. कोपरगाव
..............
मी बारावीला ७३.८३ टक्के गुण मिळविले आहेत. त्यामुळे बारावीला माझा दुसरा क्रमांक आला असून, माझ्यासह माझे पालक या निकालावर समाधानी आहेत; परंतु सीईटी परीक्षा रद्द झाल्याने मी नाराज झाले आहे.
-साक्षी गायकवाड, विद्यार्थिनी, कोपरगाव
...............
स्टार १०८३