कोटींच्या उड्डाणाचा विस्तारीकरणाला खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:28 AM2018-04-23T00:28:53+5:302018-04-23T00:30:18+5:30

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पाने १२० कोटींहून ६०० कोटींच्या पुढे धाव घेतली आहे. दीड वर्षापासून विमानतळ विस्तारीकरणाबाबत फक्त बैठका झाल्या आहेत. याबाबत काहीही निर्णय झाला नाही, मात्र प्रकल्प खर्चाच्या आकड्याने ६०० हून अधिक कोटींचे उड्डाण घेतले आहे

Dissolve the expansion of crores of flights | कोटींच्या उड्डाणाचा विस्तारीकरणाला खोडा

कोटींच्या उड्डाणाचा विस्तारीकरणाला खोडा

ठळक मुद्देचिकलठाणा विमानतळ : अभ्यास न करताच केलेल्या १२० कोटींच्या घोषणेमुळे रखडले काम; आता हवेत तब्बल ६०० कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पाने १२० कोटींहून ६०० कोटींच्या पुढे धाव घेतली आहे. दीड वर्षापासून विमानतळ विस्तारीकरणाबाबत फक्त बैठका झाल्या आहेत. याबाबत काहीही निर्णय झाला नाही, मात्र प्रकल्प खर्चाच्या आकड्याने ६०० हून अधिक कोटींचे उड्डाण घेतले आहे. परिणामी दीड वर्षात औद्योगिक क्षेत्रासह पर्यटन वृद्धीला खीळ बसली आहे. किया मोटार्ससारखा उद्योग विमानतळ विस्तारीकरणामुळेच गेल्याचे मध्यंतरी समोर आले. दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारीकरणाचा विचार सुरू असल्याचे सांगितले, तर केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी विमानतळ धावपट्टीची पाहणी करून प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर विस्तारीकरण व विकासाच्या अनुषंगाने चर्चा केली.
प्रकल्पाचा खर्च वाढल्यामुळे आणि भूसंपादनाबाबत निर्णय होत नसल्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाची कामे रेंगाळली आहेत. विस्तारीकरण प्रकरणात उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये वित्त विभागाचे सचिव, सिडको प्रशासक, एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीचे सदस्य आहेत.
१९७२ साली सिडकोने मुकुंदवाडी, मूर्तिजापूर येथील शेतकºयांच्या जमिनीवर विमानतळाचे आरक्षण टाकल्यानंतर वाटाघाटीने १९९४ साली जमिनीचा ताबा घेतला. भूसंपादन सिडकोने केले, मात्र मोबदल्यावर आज तारखेपर्यंत वाद सुरू आहे. भूसंपादन, मालमत्ता संपादन करणे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एकूण किती रक्कम लागणार याचा कुठलाही अभ्यास न करता १२० कोटींची घोषणा केल्यानंतर त्यातील एक छदामही अद्याप आलेला नाही. शिवाय भूसंपादन मोबदल्याचा वादही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही संपुष्टात आलेला नाही. दरम्यान, मागील वर्षभरात खूप पाणी वाहून गेल्यानंतर विस्तारीकरणाचा आकडा ६०० कोटींच्या आसपास गेल्याचे महसूल विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
२०१६ साली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विस्तारीकरणासाठी १२० कोटींची घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी मंत्रिमंडळ बैठक झाली नाही. आता विस्तारीकरणाला किती रक्कम लागणार यावर ठोस चर्चा होत नाही. भूसंपादनासाठी किती रक्कम लागणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने काय सर्वेक्षण केले याबाबत अजून काहीही माहिती पुढे आलेली नाही.
१० महिन्यांपासून पुढे काहीच नाही
जून २०१७ नंतर विस्तारीकरण योजनेबाबत काहीही चर्चा झालेली नाही. २३ जून २०१७ रोजी १२.५ टक्के मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि शेतकºयांत बैठक झाली होती. विकसित क्षेत्रात जमीन मिळावी किंवा चिकलठाणा येथील गायरानमधील जमीन द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी तेव्हा केली होती. मूर्तिजापूर, मुकुंदवाडी, चिकलठाणा येथील काही शेतकºयांना मोबदला मिळालेला नाही. महिनाभरात तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते. १८२ एकर जमिनीसाठी पीडब्ल्यूडीने सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे आदेश होते. १० महिन्यांपासून काहीही निर्णय झालेला नाही.
विमानतळाची सद्य:स्थिती
५५७ एकरमध्ये विमानतळ आहे.
विस्तारीकरणासाठी १८२ एकर जागा हवी आहे.
भूसंपादनासाठीच २०० कोटींची गरज आहे.
दीड वर्षात पाच बैठका झाल्या आहेत.
मोफत जमीन मिळावी असे प्राधिकरणाला वाटते.
डीएमआयसीमुळे विमानतळ विस्तारीकरण गरजेचे.
औरंगाबादेत एव्हीएशन अक ादमीला तत्त्वत: मंजुरी
सीएमआयएने एव्हीएशन अकादमी औरंगाबादेत सुरू करण्याचा प्रस्ताव घेऊन सीएमआयएचे शिष्टमंडळ केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांना भेटले. सीएमआयएच्या प्रस्तावाला त्यांनी तत्त्वत: मंजुरी दिली असून, दोन महिन्यांत एव्हीएशन अकादमीचा आराखडा अंतिम होईल. त्यानंतर अकादमीतून कोणते अभ्यासक्रम चालवायचे. कोणत्या संस्थेसोबत भागीदारी करायची, याचा निर्णय होणार आहे. मेंटेनन्स कोर्स, सर्व्हिस सेक्टर व इतर कोर्सेसबाबत अंतिम मंजुरीनंतर निर्णय होईल. शिष्टमंडळ सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, उद्योजक उल्हास गवळी, मानसिंग पवार आदींची उपस्थिती होती.
विमानतळ प्राधिकरणाचा आढावा
रविवारी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांनी औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टी विस्तार योजनेप्रकरणी प्राधिकरणाच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. त्यांनी विमानतळाची पाहणी केली. तसेच विमानतळावरून कनेक्टिव्हिटी वाढविण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली. यावेळी विमानतळ संचालक डी. जी. साळवे यांच्यासह अधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांनी औरंगाबाद ते गोवा, जोधपूर, जयूपर, दिल्ली, बंगलोर, पुणे, नागपूर विमानसेवा येथून सुरू करण्याची मागणी केली.

Web Title: Dissolve the expansion of crores of flights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.