जि. प. परीक्षेसाठी ४ हजार संगणकावर व्यवस्था, ३ ॲाक्टोबरपासून ॲानलाईन परीक्षा
By चंद्रकांत शेळके | Published: September 21, 2023 10:03 PM2023-09-21T22:03:09+5:302023-09-21T22:03:22+5:30
पहिल्या ८ संवर्गासाठी ३ ते ११ ॲाक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या गट क मधील रिक्त ९३५ जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज भरल्यानंतर आता ३ ॲाक्टोबरपासून विविध टप्प्यांत परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या ८ संवर्गासाठी ३ ते ११ ॲाक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहे. दरम्यान, परीक्षेसाठी जिल्हा परिषदेने कंपनीला विविध २० केंद्र सूचवले असून तेथे ४ हजार संगणक सज्ज आहेत. यातून कंंपनी सोयीच्या केंद्रांची निवड करणार आहे.
राज्यात सर्व जिल्हा परिषद पदभरतीची प्रक्रिया आयबीपीएस या खासगी कंपनीकडून राबविली जात आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हा परिषदेच्या गट क मधील १९ संवर्गात ९३५ जागांसाठी ४ ॲागस्टला जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर ५ ते २५ ॲागस्टदरम्यान ॲानलाईन अर्ज भरण्याची मुदत होती. या मुदतीत जिल्ह्यात ४४ हजार ७२६ अर्ज प्राप्त झाले. यात खुल्या प्रवर्गासाठी १ हजार रूपये, तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रूपये परीक्षा शुल्क आहे. अर्ज भरल्यानंतर आता महिनाभराने कंपनीकडून परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात एकाच वेळी विविध टप्प्यात ही परीक्षा होत आहे.
येथे डाऊनलोड करता येतील प्रवेशपत्र
दरम्यान, उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर स्वतंत्र्य लिंक परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तेथून उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील परीक्षा वेळापत्रक
कनिष्ठ लेखाधिकारी (जागा ४) - ३ ॲाक्टोबर
कनिष्ठ अभियंता (विद्युत, जागा १)- ३ ॲॅाक्टोबर
पशुधन पर्यवेक्षक (जागा ४२) - ५ ॲॅाक्टोबर
वरिष्ठ सहायक लेखा (जागा ७) - ७ ॲॅाक्टोबर
विस्तार अधिकारी सांख्यिकी (जागा ४) - ८ ॲाक्टोबर
विस्तार अधिकारी कृषी (जागा १) - १० ॲाक्टोबर
लघूलेखक उच्चश्रेणी (जागा १) - ११ ॲाक्टोबर
कनिष्ठ सहायक लेखा (जागा १६) - ११ ॲाक्टोबर
या पदांची परीक्षा दुसऱ्या टप्प्यात
दरम्यान, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक (पुरूष), हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, औधष निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहायक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता या संवर्गातील पदांचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.