ई- पॉस मशीन्स बंद पडल्याने स्वस्त धान्याचे वाटप रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:19 AM2021-03-14T04:19:25+5:302021-03-14T04:19:25+5:30
अहमदनगर : एक मार्चपासून वाटप करण्यासाठीचे धान्य आठ ते दहा मार्चपर्यंत स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचले. मात्र, स्वस्त धान्य दुकानांवरील ...
अहमदनगर : एक मार्चपासून वाटप करण्यासाठीचे धान्य आठ ते दहा मार्चपर्यंत स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचले. मात्र, स्वस्त धान्य दुकानांवरील ई-पॉस मशीन्स बंद पडल्याने धान्य वाटपच बंद पडले आहे. त्यामुळे गोरगरिबांना आणखी दहा दिवस धान्याची वाट पहावी लागणार आहे.
स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून ई-पॉस मशीन्सच्या साहाय्याने कार्डधारकांना नियमित धान्य पुरवठा केला जातो. या मशीन्सचा डाटा दर महिन्याला एनआयसी एजन्सीकडून घेतला जातो. यासाठी ऑनलाईन पद्धतीने मशीन्सवरील डाटा घेणे आणि साठानिहाय अपलोड करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कामासाठी एक मार्चला मशीन्स बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. या मशीन्स १३ मार्च उजाडला तरी सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांवरील धान्याचे वितरण होऊ शकलेले नाही. जिल्हा पुरवठा विभागाने लाभार्थ्यांना देण्यासाठी गहू, तांदूळ, ज्वारी, मका या धान्याचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानांना केलेला आहे. मात्र, यंत्रणाच सुरू नसल्याने धान्याचे वाटप अद्याप झालेले नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानांतून धान्याचे वाटप केले जाते. कष्टकऱ्यांना दरमहा रेशनवर मिळणाऱ्या धान्याचा मोठा आधार असतो. मात्र, १३ दिवस झाले तरी धान्य न मिळाल्याने त्यांचीही परवड सुरू झाली आहे. ई-पॉस यंत्रणा पूर्ववत कधी होणार ? याबाबत सध्यातरी कोणाकडेच निश्चित असे उत्तर नाही. हा बिघाड नसून यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विलंब असल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत.
-----------
पुरवठा व्यवस्थापन साखळी अंमलबजावणी ऑनलाईन करण्याची प्रक्रिया चालू असल्याने विलंब होत आहे. ही समस्या एकट्या नगर जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यातच ही समस्या आहे. अडचण दूर होण्यास आणखी आठ दिवस लागणार आहेत. त्यानंतर ई-पॉस मशीन्स सुरू होतील आणि धान्य वाटप होईल, सर्व स्वस्त धान्य दुकानांना धान्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
-जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी
------------
असे आहेत धान्याचे लाभार्थी कार्डधारक
अंत्योदय-८८,६१८
प्राधान्य कुटुंब-६,०५,५२४
एकूण लाभार्थी कार्डधारक-६,९४,१४२
-------
फोटो- १३ पॉस मशीन