एक हजार लोककलावंत कुटुंबांना किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:20 AM2020-04-17T11:20:20+5:302020-04-17T11:21:58+5:30
ग्रामीण विकास केंद्र जामखेड, कोरो (मुंबई) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वंचित, भटके, आदिवासी, कलावंत अशा एक हजार कुटुंबांना धान्य, किराणा मालाचे वाटप केल्याची माहिती डॉ. अरुण जाधव यांनी दिली.
जामखेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण विकास केंद्र जामखेड, कोरो (मुंबई) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वंचित, भटके, आदिवासी, कलावंत अशा एक हजार कुटुंबांना धान्य, किराणा मालाचे वाटप केल्याची माहिती डॉ. अरुण जाधव यांनी दिली.
जामखेड शहरातील कुंभारतळे, मिलिंदनगर, तपनेश्वर गल्ली, कान्होपात्रा नगर यासह तालुक्यातील भवरवाडी, मोहा, खांडवी, खर्डा, पिंपळगाव आवळा, वाकी, बाळगव्हान आदी गावात किराण्याच्या किटचे वाटप करण्यात आले. कर्जत शहर व तालुक्यातील पाटेवाडी, तळवडी, कुळधरण, हंडाळवाडी, निमगाव डाकू, चापडगावसह श्रीगोंदा शहर व तालुक्यातील ढोकराई, पारगाव, संतवाडी, लोणी व्यंकनाथ, आढळगाव, टाकळी लोणार, कोसे गव्हाण आदी गावातील दलित, आदिवासी, भटके विमुुक्त समाजातील कैकाडी, वडार, पारधी, नाथपंथी डवरी गोसावी, कोल्हाटी, भिल्ल व पारधी अशा वंचित घटकांतील कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. जामखेड येथील लोककलावंत अनिता जाधव, गौरी शिंदे, काजल माने, शीतल जाधव, आशा कांबळे, सोनाली काळे, रेश्मा घरफोडे, शामल जाधव यांनी गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, चना डाळ, शेंगदाणे, तेल, तिखट, मीठ, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचे एक हजार किट तयार केले. यासाठी बापू ओहोळ यांचेही मार्गदर्शन लाभले. ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे कार्यकर्ते वैजीनाथ केसकर, राकेश साळवे, संतोष चव्हाण, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, द्वारका पवार, अरुण डोळस, सोमनाथ भैलुमे, अॅड. विकास शिंदे, जालिंदर शिंदे, मनीषा काळे, विशाल जाधव, अमोल अंधारे, केशव जाधव, मच्छिंद्र जाधव, संतोष भोसले, विशाल पवार, तुकाराम पवार, संगीता केसकर, काजोरी पवार, सुशीला ढेकळे, स्वाती हापटे, शिल्पा पारवे, शुभांगी राऊत, लता सावंत आदींनी गावोगावच्या गरजू कुटुंबांना घरपोहोच साहित्य वाटप केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचे होणारे हाल डॉ. अरुण जाधव यांनी मुंबईतील कोरो या स्वयंसेवी संस्थेच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे कोरो संस्थेचे संचालक महेंद्र रोकडे व मुमताज शेख यांनी आर्थिक मदत केली. ग्रामीण विकास केंद्रानेही गरजूंना मदतीचा हात दिला.