जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू
By Admin | Published: August 10, 2014 11:16 PM2014-08-10T23:16:01+5:302014-08-10T23:27:47+5:30
अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे़
अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे़ मतदानयंत्रे शहरात दाखल झाली असून,राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित यंत्रणांची मंगळवारपासून तपासणी केली जाणार आहे़ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नागपूर औद्योगिक वसाहतीच्या वखार महामंडळाच्या गोदामात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे़
विधानसभा निवडणुकीच्या हालचाली जोरात सुरू आहेत़ राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे़ निवडणुकीसाठीची आचारसंहितेबाबत मात्र प्रशासनाकडून गुप्तता पाळली जात आहे़ आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते, असे बोलले जात आहे़ त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागानेही तयारी सुरू केली आहे़ मतदार यादीही निवडणूक शाखेने जाहीर केली आहे़ मतदान प्रकियेसाठी सन २००६ नंतरचे मतदानयंत्रणे वापरावीत, अशी सूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे़ त्यानुसार उत्तरप्रदेशातून ११ हजार यंत्रे मागविण्यात आली होती़ ही यंत्रणे वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आले आहेत़ परिसरात चोवीसतास पोलिसांचा खडा पाहारा आहे़ दाखल झालेली यंत्रे चालतात का, बटन व्यवस्थित आहे किंवा नाही,यंत्रात काही बिघाड आहे काय,याची तपासणी करण्यासाठी नागपूर येथील इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशन इंडिया कंपनीचे प्रतिनिधी येणार आहे़ त्यांच्याकडून मंगळवारी सकाळी १० वा.पासून यंत्रांची तपासणी सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ यंत्र तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर ते जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत़ त्यापूर्वी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खात्री केली जाईल़ मतदानाच्यावेळी त्या-त्या केंद्रांवर हे यंत्र पाठविले जाणार आहेत़ विविध राजकीय पक्षांना तपासणीच्यावेळी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे़ तसे पत्र त्यांना देण्यात आले आहेत़ त्यांच्या उपस्थितच यंत्रणांची तपासणी होणार असून, ही तपासणी सकाळी १० वाजेपासून सुरू होईल़ त्यामुळे यावेळेतच राजकीय प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे़