जिल्हा बँकेत कारखानदारांचाच धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:12+5:302021-02-27T04:27:12+5:30
अहमदनगर : आपण कारखानदारांच्या जीवावर नव्हे, तर जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलो असून, जिल्हा बँकेत या कारखानदारांनीच ...
अहमदनगर : आपण कारखानदारांच्या जीवावर नव्हे, तर जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलो असून, जिल्हा बँकेत या कारखानदारांनीच धुडगूस घातला आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला.
जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आल्यानंतर कर्डिले यांचा नगर तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी साखर कारखानदारांचा समाचार घेतला. ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झाली नाही, हेच बरे झाले. बिनविरोध निवडून आलो असतो, तर प्रस्थापित कारखानदार म्हणाले असते की, आमच्यामुळेच संचालक झाले, असा टोला कर्डिले यांनी लगावला.
कर्डिले म्हणाले, जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलो आहे. सर्वसामान्यांचा पुढारी म्हणून ओळख आहे. जिल्हा बँकेतील विजयातून प्रत्येकाला उत्तर मिळालेले आहे. राजकारणात सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला. त्यातून सत्ता मिळाली. संघर्ष केल्याशिवाय मलाही आता करमत नाही. राजकारणात नेहमीच गोरगरिबांचे प्रश्न मांडण्याचे काम केले, असे कर्डिले म्हणाले. यावेळी नगर तालुका खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश सुंबे, उपाध्यक्ष छत्रपती बोरुडे, संचालक संभाजी पवार, अंबादास बेरड, अंबादास शेळके, ज्ञानदेव शिंदे, जगन्नाथ कराळे, अनिल ठोंबरे, लक्ष्मण नरवडे, श्रीकांत जगदाळे, अप्पासाहेब कुलट आदी उपस्थित होते.
..