जिल्हा बँक प्रथमच भाजपाच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 03:13 PM2019-07-31T15:13:57+5:302019-07-31T15:16:31+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वेगाने वाहतायेत़ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेत्यांच्या कोलांट उड्या सुरू असल्या तरी त्याचे पडसाद सहकारी संस्थांतही उमटत आहेत़

District Bank in the hands of BJP for the first time | जिल्हा बँक प्रथमच भाजपाच्या हाती

जिल्हा बँक प्रथमच भाजपाच्या हाती

अण्णा नवथर
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वेगाने वाहतायेत़ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेत्यांच्या कोलांट उड्या सुरू असल्या तरी त्याचे पडसाद सहकारी संस्थांतही उमटत आहेत़ राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचडांसोबत जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनीही भाजपाची वाट धरली़ जिल्हा बँकेतील थोरात गटाचे संख्याबळ दोनने कमी होऊन विखे यांचे म्हणजेच पर्यायाने भाजपाचे पारडे जड झाले आहे़
पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले राधाकृष्ण विखे यांनी भाजपात प्रवेश केला़ त्यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड पुत्र आमदार वैभवसह बुधवारी भाजपात जात आहेत़ जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हे पिचड यांचे निकटवर्तीय मानले जातात़ तेही आपल्या नेत्यासोबत भाजपच्या तंबूत दाखल होतील़ त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा केव्हाच देऊन टाकला आहे़ आमदार वैभव पिचड स्वत: बँकेचे संचालक आहेत़ हे दोघेही थोरात गटाचे होते़ ते भाजपात गेले आहेत़ त्यामुळे ते आता विखे गटात गणले जातील़ त्यामुळे थोरात यांच्या गटाची संख्या दोनने कमी होऊन विखे गटाची दोनने वाढेल़ त्यात पूर्वी थोरात गटात समावेश असलेले ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली आहे़ तसेच पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळेही थोरात यांच्याच गटाच्या होत्या़ परंतु, विखे भाजपात गेल्याने त्या थोरातांसोबत राहतील की विखेंसोबत, ते आता सांगणे कठीण आहे़
जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी ते साखर कारखाने, यांना कर्ज रुपाने पतपुरवठा करणारी ही एकमेव बँक आहे़ त्यामुळे जिल्हा बँकेवरील वर्चस्व कायम ठेवणे जिल्ह्यातील साखर सम्राटांची गरज आहे़ काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापर्यंत ते टिकवून ठेवले होते़ परंतु, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे बँकेवरील सत्तेचा लंबक भाजपाच्या बाजूने झुकलेला दिसतो़

थोरात गट (काँगे्रस- राष्ट्रवादी)
बाजीराव खेमनर, रामदास वाघ, रावसाहेब शेळके, मीनाक्षी साळुंके, चंद्रशेखर घुले, यशवंतराव गडाख, उदय शेळके, चैताली काळे, अरुण तनपुरे, अरूण जगताप़

विखे गट (भाजप)
अण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ, जगन्नाथ राळेभात, दत्ता पानसरे, मोनिका राजळे, करण ससाणे, शिवाजी कर्डिले, बिपीन कोल्हे, सुरेश करपे, वैभव पिचड, अध्यक्ष सीताराम गायकर,

विखे, कर्डिलेंची भूमिका महत्वाची
जिल्हा बँकेच्या राजकारणात गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार शिवाजी कर्डिले यांची भूमिका यापुढे महत्वाची ठरणार आहे़ त्यांच्या पक्षाची संख्या वाढल्याने ते ठरवतील तोच यापुढे जिल्हा बँकेचा अध्यक्ष होईल़ येत्या मे महिन्यात बँकेची निवडणूक आहे़ तोपर्यंत विधानसभा निवडणुका होऊन जातील़
निवडणुकीत कोण कुठे जातो की आहे तिथेच राहतात, यावरच जिल्हा बँकेचे राजकारण अवलंबून असणार आहे़

 

Web Title: District Bank in the hands of BJP for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.