नामंजूर केलेल्या २८ कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:13 AM2021-03-29T04:13:58+5:302021-03-29T04:13:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगाव नगर परिषदेकडून शहर विकासाच्या दृष्टीने बांधकाम विभागामार्फत सुमारे ८ कोटी खर्चाच्या २८ कामांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोपरगाव नगर परिषदेकडून शहर विकासाच्या दृष्टीने बांधकाम विभागामार्फत सुमारे ८ कोटी खर्चाच्या २८ कामांचा आराखडा तयार करून तो तीन वेळा मंजुरीसाठी ठेवली होता. परंतु, भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीनही वेळेस नामंजुरीचा ठराव केला. त्यावर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपले विशेषाधिकार वापरून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणजे ऐकून त्यास मंजुरी दिल्याचा आदेश नुकताच काढला आहे.
नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सर्वसाधारण सभेनंतर दोन दिवसातच त्यांचे विशेषाधिकाराचा वापर करून या कामाच्या मंजुरीसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे १८ फेब्रुवारीला प्रस्ताव दाखल केला. त्यावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी १० मार्च व १९ मार्च अशी दोन वेळा सुनावणी घेऊन कामांना मंजुरी दिली आहे.
दरम्यान, कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने सुमारे ८ कोटी खर्च करून करण्यात येणाऱ्या कामाच्या निविदा ह्या अव्वाच्या सव्वा रकमेच्या असून यांचे फेरअंदापत्रक काढावे. त्यातून बचत होणाऱ्या नगर परिषदेच्या रकमेतून शहरातील इतरही प्रभागातील विकासकामे होतील व याच कामांच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचारही टळेल, अशी भूमिका घेत भाजप व शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी ही सर्वच कामे तीनवेळा नामंजूर केली. आता ही कामे होणार की नाही? किंवा आणखी काही राजकीय नाट्य रंगणार हे लवकरच कळेल.
.............
कामांच्या नामंजुरी ते मंजुरीपर्यंतचा घटनाक्रम
* १२ जानेवारीच्या स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत १२ कामे नामंजूर
* १ फेब्रुवारीच्या स्थायीच्या दुसऱ्या बैठकीत ३१ पैकी ३ कामे मंजूर तर २८ कामे नामंजूर
* १६ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत सर्वच २८ कामे नामंजूर
* १८ फेब्रुवारीला मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल
* २३ फेब्रुवारीला नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दाखल
* १० व १९ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी
* २३ मार्चला सर्वसधारण सभेतील नामंजूर केलेला ठराव तहकूब केला. त्यानंतर कामांच्या मंजुरीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला.
...............
बहुमताच्या जोरावर अनेक विकासकामे नामंजूर करणाऱ्या कोल्हे गटाला जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे चपराक बसून शहरवासीयांना न्याय मिळाला आहे. स्वतःच्याही प्रभागातील विकासकामे नामंजूर करण्याचा मूर्खपणा महाराष्ट्रात कुणीही केलेला नसावा. तो कोल्हे गटातील काही नगरसेवकांनी केलेला आहे.
-विजय वहाडणे, नगराध्यक्ष, कोपरगाव
............
या कामांसंदर्भात येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका जाहीर करण्यात येईल.
-स्वप्नील निखाडे, उपनगराध्यक्ष, कोपरगाव (कोल्हे गट)
.............