वाळू तस्करांबाबत जिल्हाधिकारी मौनात : स्वयंसेवी संस्थांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:50 PM2018-05-31T13:50:00+5:302018-05-31T13:50:16+5:30
जिल्ह्यातील वाळू तस्करांची मुजोरी ठेचण्याऐवजी जिल्हाधिकारी मात्र बैठकांमध्ये व्यस्त आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अॅड. श्याम असावा यांना वाळू तस्करांनी धमकी दिली. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाच्या कार्यकर्त्यांसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना वेळ नव्हता. त्यामुळे संस्थांचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांच्यासह स्वयंसेवी संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अहमदनगर : जिल्ह्यातील वाळू तस्करांची मुजोरी ठेचण्याऐवजी जिल्हाधिकारी मात्र बैठकांमध्ये व्यस्त आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अॅड. श्याम असावा यांना वाळू तस्करांनी धमकी दिली. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाच्या कार्यकर्त्यांसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना वेळ नव्हता. त्यामुळे संस्थांचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांच्यासह स्वयंसेवी संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नगर जिल्ह्यात बेसुमार वाळूउपसा सुरु असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे वाळूतस्करांचे धाडस वाढले असून एका वाळूतस्कराने मंगळवारी थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अॅड. शाम आसावा यांना धमकी दिली. ‘लोकमत’ कार्यालयावरही काही वाळूतस्करांनी पाळत ठेवल्याचा प्रकार घडला आहे. ‘लोकमत’ने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
नगर जिल्ह्णात मार्च महिन्यात वाळूचे लिलाव देण्यात आले आहेत. या लिलावाची अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे व जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे यांनी केलेली प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याची बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणली आहे. ही गंभीर बाब असतानाही प्रशासनाकडून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.
वाळू तस्करांच्या या कृतीविरोधात दाद मागण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थाच्या महासंघाचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. मात्र जिल्हाधिकारी द्विवेदी बैठकांमध्ये व्यस्त आहेत. बैठक झाल्यानंतर भेटण्याचा त्यांनी निरोप धाडला. त्यामुळे विविध स्वयंसेवी संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी यांना यापूर्वी अवैध पद्धतीने सुरू असलेल्या तस्करीचे व्हीडिओ पाठवूनही त्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे निवेदन घेवून ते काय कारवाई करणार? असा सवाल अॅड. असावा यांनी केला. यावेळी स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, विशाल अहिरे,भिरेन गायकवाड, विकास सुतार, संकेत होले, रोहित तनपुरे, अब्दुल खान,प्रणित कोटा, आलिम पठाण, किशोर मुनोत आदी उपस्थित होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन दिले. त्यांनी कारवाई करू, असे दोन ओळीचे तोंडी आश्वासन देवून कार्यकर्त्यांची बोळवण केली.