आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचे जिल्हाभर धरणे
By Admin | Published: October 19, 2016 12:48 AM2016-10-19T00:48:38+5:302016-10-19T01:06:13+5:30
अहमदनगर : पाच टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांनी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे धरले़
अहमदनगर : पाच टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांनी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे धरले़ अकोले आणि पारनेर तालुक्यात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ सरकारने मुस्लिमांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर आंदोलने करण्याचा इशारा जमियत- उलमा ए हिंद संघटनेच्या वतीने यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला आहे़
मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे,या मागणीसाठी मुस्लीम समाजाच्या वतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले़ नगरमध्ये जमियत- उलमा ए हिंद संघटनेचे अध्यक्ष इर्शादउल्ला मकदुमी, व सचिव सय्यद खलील अब्दुल करीम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते़ सकाळी ११ वाजता समाज बांधवांनी धरणे सुरू केले़ दरम्यान जिल्ह्यातील अकोले व पारनेर तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांतील मुस्लीम बांधवांनी तहसील कार्यालयांसमोर धरणे सुरू केले़ तहसीलदारांना निवेदन देऊन ५ टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आली़ जिल्ह्यासह तालुका पातळीवर एकाच दिवशी आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला़ आघाडी सरकारने दिलेले ५ टक्के आरक्षण पुन्हा मिळावे, अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली़
भारतीय मुस्लीम समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात पीछेहाट झाली आहे़ मुस्लीम समाज अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून, त्यामुळेच मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते़ तत्कालीन सरकारने मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षणाचा आदेश दिला होता़ नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण लागूही झाले़ न्यायालयाने मुस्लिमांचे ५ टक्के आरक्षण वैध ठरविले होते़ परंतु, यासंदर्भात सरकारने कोणतेही ठोस भूमिका घेतली नाही़ परिणामी मुस्लिमांचे आरक्षणही अधांतरीच राहिले़ भाजपा सरकार सत्तेवर येऊन बराच काळ लोटला़ परंतु, सरकारने याबाबत एकदाही भूमिका मांडली नाही़ सरकारात मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत कमालीची उदासीनता असून, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अन्यायकारक आहे़ सरकार मुस्लिमांना आरक्षण देण्यास जाणीवपूर्वक चालढकल करत असून, मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळावा़ मुस्लिमांच्या न्याय मागण्यांकडे सरकारने कानाडोळा करू नये, अन्यथा राज्यभर आंदोलने करण्यात येतील, असा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आला आहे़ मौलाना अन्वर नदवी, सय्यद खलील, नसीर शेख, निसार बागवान, हाजी शौकत तांबोळी, मुस्तफा खान, सय्यद वहाब, उबेद शेख आदींची यावेळी भाषणे झाली़