जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:32 AM2019-04-02T10:32:39+5:302019-04-02T10:32:46+5:30
जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजीराव रामभाऊ गाडे (वय - ५६) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
राहुरी : जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजीराव रामभाऊ गाडे (वय - ५६) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राहुरी तालुक्यात राजकिय पोकळी निर्माण झाली आहे.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांच्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात झाली. रामदास पाटील धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली विकास मंडळाची कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकिय प्रवास सुरु केला होता. मुळा प्रवरा इलेकिट्रक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव गाडे यांना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली संधी मिळाली होती. राहुरी पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. राहुरी विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढविलेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. २०१४ मध्ये झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी दुस-यादा आपले नशीब आजमावले होते. राहुरी सहकारी साखर कारखान्यात शेतकरी मंडळ पॅनल उभा करत आठ जागाही त्यांनी जिंकल्या होत्या. ३ वर्षापुर्वी झालेल्या राहुरी कारखान्याच्या निवडणुकीत गाडे यांनी पुन्हा विजय संपादन केला होता.
जिल्हा परिषदेच्या बारागाव नांदूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी विजय मिळविला होता. अहमदनगर जिल्हा परिषदचे ते विद्यमान सदस्य होते. सामान्य, गोरगरिबांचा राजा म्हणून त्यांची ओळख होती. अपघात झाल्यास त्या ठिकाणी धावत जावून अपघातग्रस्तांना मदत करत असत. हजारो लोकांची त्यांनी प्राण वाचविले. त्यांच्या पश्चात आई, चुलती, पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.