निवडणुकांपूर्वी जिल्हा विभाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 09:54 PM2018-01-28T21:54:00+5:302018-01-28T21:56:11+5:30
कोकमठाण येथे रविवारी जंगलीदास महाराज आश्रमात महावितरणच्या अभियंता संघटनेचे ४५ वे वार्षिक अधिवेशनात झाले.
कोपरगाव : अहमदनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा असल्याने कामाचा ताण वाढतो. त्यावर जिल्हा विभाजन हा महत्त्वाचा पर्याय असून, त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. येत्या विधानसभा निवडणुकांपुर्वी जिल्हा विभाजनाची घोषणा होऊन नवीन जिल्हे अस्तित्वात येतील, असे सूतोवाच पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.
कोकमठाण येथे रविवारी जंगलीदास महाराज आश्रमात महावितरणच्या अभियंता संघटनेचे ४५ वे वार्षिक अधिवेशनात झाले. या अधिवेशनाचे शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार स्नेहलता कोल्हे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, संचालक गणपत मुंडे, सतीश कर्पे, संघटनेचे अध्यक्ष संजय ठाकूर, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विजय राणे, प्रताप शेळके आदी उपस्थित होते.
मंत्री शिंदे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपले काम करताना क्षमता सिद्ध करावी. चांगल्या कामात पाठबळ दिल्यास कामे सुलभ होतात, असे सांगून प्रा. शिंदे यांनी शेतकºयांना वेळेत वीज देण्याची सूचना केली. महाराष्ट्रातील सर्व खात्यांना लोकसेवक बिल लागू झाले असेल तर ऊर्जा खात्याच्या महावितरणलाही लोकसेवकाचे बिल लागू झाले पाहिजे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहेत. सोशल मीडियातून वीज विषयक तक्रारी सकारात्मक घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येकाने आपल्या कामात कर्तव्यदक्ष राहावे, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी राज्यभरातील अभियंता व अधिकारी उपस्थित होते.
मुख्यालयाचे ठिकाणचा निर्णय
अनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. जिल्ह्याच्या विविध खात्यांच्या प्रमुखांना व अधिकºयांना मोठ्या जिल्ह्यात जाणं, सेवा देणं जिकिरीच काम होत. जनभावनेनुसार जिल्ह्याचे विभाजन होऊन दोन जिल्हे झाले पाहिजेत. त्या दृष्टीने राज्यसरकार प्रयत्नशील आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करताना पूर्वी जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर असावे, की संगमनेर या वरून वाद होत होते. मात्र ते वाद तेव्हाच्या सरकारमधील लोकांमध्ये समन्वय नसल्याने होत होते. आता सरकार बदललेले आहे. त्यामुळे हेडक्वॉर्टरच्या संदर्भात योग्य तो निर्णय राज्यसरकार घेईल, असेही राम शिंदे यांनी सांगितले.