जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८ टक्के : टक्का घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 06:34 PM2019-05-28T18:34:41+5:302019-05-28T18:35:13+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये मागील वर्षीपेक्षा नगरचा निकाल घसरून ८८.०७ टक्क््यांवर आला आहे.
अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये मागील वर्षीपेक्षा नगरचा निकाल घसरून ८८.०७ टक्क््यांवर आला आहे. पुणे विभागात मात्र नगरला दुसरे स्थान मिळाले, जे गतवर्षी तिसऱ्या स्थानावर होते. नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनीच निकालात बाजी मारली आहे.
यंदा बारावी परिक्षेसाठी ३६ हजार ८१८ मुले व २५ हजार ५४० मुली असे एकूण ६२ हजार ३४० जण प्रविष्ठ झाले होते. त्यातील ३१ हजार ३९ मुले व २३ हजार ८६३ मुली असे एकूण ५४ हजार ९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण ८४.४० टक्के आहे, तर मुलींनी निकालात मागील वर्षीप्रमाणे बाजी मारत उत्तीर्णचे प्रमाण ८८.०७ टक्के असे ठेवले आहे.
नगर जिल्हा मागील वर्षी विभागात तिसरा होता. यंदा मात्र नगरला (८८.०७) विभागात दुसरे स्थान मिळाले आहे. विभागात सोलापूर जिल्हा अव्वल (८८.१९) ठरला असून, पुणे जिल्हा (८७.६५) तळाशी राहिला. जिल्ह्यात जामखेड तालुका ९२.८७ टक्क्यांनिशी अग्रस्थानी आहे, तर सर्वात कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा (७६.७४) नोंदवला गेला.
मागील वर्षी निकाल ३० मे रोजी जाहीर झाला होता. त्या तुलनेत यंदा निकाल दोन दिवस लवकर लागला. या बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. मंगळवारी सकाळी अकरा वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर नेटकॅफे, तसेच मोबाईलवर विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला.
मुलांचे उत्तीर्ण प्रमाण : ८४.४० टक्के
मुलींचे उत्तीर्ण प्रमाण : ८८.०७ टक्के
शाखानिहाय निकाल
विज्ञान : ९६.२३ टक्के
वाणिज्य : ९२.०९ टक्के
कला : ७४.०४ टक्के
व्यावसायिक अभ्यासक्रम : ७८. ६१ टक्के
एकूण : ८८.०७ टक्के