दिव्यत्वाची जेथे हेळसांड, त्याचे सिव्हील ऐैसे नाव!
By साहेबराव नरसाळे | Published: December 13, 2018 01:31 PM2018-12-13T13:31:34+5:302018-12-13T13:33:52+5:30
अपंग बांधवांना कोणीही अपंग म्हणवून हिणवू नये, त्यांची चेष्टा करु नये, यासाठी सरकारने अपंग शब्द वगळून दिव्यांग शब्दाचे प्रयोजन सक्तीचे केले.
साहेबराव नरसाळे
अहमदनगर : अपंग बांधवांना कोणीही अपंग म्हणवून हिणवू नये, त्यांची चेष्टा करु नये, यासाठी सरकारने अपंग शब्द वगळून दिव्यांग शब्दाचे प्रयोजन सक्तीचे केले. मात्र, याच सरकारकडून दिव्यांग बांधवांची हेळसांड सुरु असल्याचे जिल्हा रुग्णालयात पहावयास मिळते. आॅनलाईन प्रमाणपत्रासाठी दोन-दोन आठवडे चकरा मारुनही ते मिळत नाही तर ज्यांना चालता येत नाही, उभे राहता येत नाही त्यांनाही रांगे उभे राहण्याची सक्ती केली जाते. या दालनातून-त्या दालनात फिरण्याची सजाही जिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांना मिळते. हे कमी की काय म्हणून दिव्यांगांना अतिशय खालच्या पातळीत, दरडावून बोलण्यात डॉक्टर आणि शिपाईही कमी करीत नाहीत. त्यामुळे ‘शहाण्याने कोर्टाची आणि दिव्यांगांनी जिल्हा रुग्णालयाची पायरी चढू नये,’ अशी म्हणच आता या दिव्यांग बांधवांमध्ये रुढ झाली आहे.
आॅनलाईन अपंग प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, असा दंडक शासनाने केला आहे. मात्र, हेच आॅनलाईन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांग बांधवांना मोठे दिव्य पार पाडावे लागत आहे.
दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांना आॅनलाईन दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, एका फेरीत कधीच प्रमाणपत्र मिळत नाही. दोन, तीन आठवडे चकरा मारण्यातच जातात़.असाच एक दिव्यांग बांधव बुधवारी जिल्हा रुग्णालयात आला होता़ तो माळीवाडा येथे राहतो़ तेथून तो रिक्षाने प्रमाणपत्र घेण्यासाठी आला होता़ त्याला चालता येत नाही़ जिल्हा रुग्णालयाच्या दारात रिक्षातून तो उतरला़ त्याला कोणीही व्हीलचेअर दिली नाही़ शेवटी फरपटत तो दिव्यांग कक्षात पोहोचला़ जेथे उभे रहायलाही जागा नाही, अशा गर्दीतून तो फरपटत बाह्यरुग्ण विभागापर्यंत पोहोचला़ पण शिपायाने त्याला रांगेत उभे राहण्याचा सल्ला देत मागे पाठविले़ रांगेत कसा उभा राहणार?, असा त्याचा सवालही या बहिऱ्या यंत्रणेला ऐकू आला नाही़ तो पुन्हा फरपटत मागे गेला अन् रांगेला चिकटला़
सोमनाथ पवार हे त्यांच्या नातेवाईकांना घेऊन जिल्हा रुग्णालयात बुधवारी आले होते़ त्यांच्या नातेवाईकांना चालता येत नाही़ डोळेही काम करीत नाहीत़ एका अपघातात त्यांचे पाय गेले आणि नंतर नजरही गेली़ खासगी गाडी करुन ते जिल्हा रुग्णालयात आले तर त्यांच्या गाडीलाही जिल्हा रुग्णालयात आणण्यास मज्जाव करण्यात आला़ त्यांनी तीन नर्सेसला गाठून व्हीलचेअर मागितली़ पण कोणीही दिली नाही़ शेवटी हाता-पाया पडून त्यांनी खासगी गाडी जिल्हा रुग्णालयात आणण्याची परवानगी मिळविली़ एका कोपºयात गाडी उभी करीत असताना गाडीचे चाक चेंबरवर गेले अन् चेंबर तुटले़ या चेंबरची भरपाईही पवार यांच्याकडे मागण्यात आली़ कसेबसे पवार यांना उचलून त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग कक्षात आणले़ पण तेथून हे करा, तेथे जा, येथे नका थांबू अशा सूचना त्यांना मिळत राहिल्या़ प्रत्येक वेळी त्यांना त्या नातेवाईकांना उचलून नेण्याचे कष्ट करावे लागत होते़ वारंवार त्यांनी व्हीलचेअर मागूनही त्यांना ती देण्यात आली नाही़
दिव्यांगांची हेळसांड थांबविण्यासाठी मुरंबीकर काय करणार?
प्रत्येक बुधवारी जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होते़ त्यामुळे दिव्यांगांसह इतर रुग्णांचीही हेळसांड होते़ त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ पी़ एस़ मुरंबीकर यांनी दिव्यांग बांधवांना आठवड्यातून दोन वार ठरवून द्यायला हवेत किंवा तालुकास्तरावर नोंदणी करुन दिव्यांगांना वार ठरवून देऊनच त्यांना जिल्हा रुग्णालयात बोलविले पाहिजे़ म्हणजे दिव्यांगांचीही हेळसांड होणार नाही अन् जिल्हा रुग्णालयावरही अतिरिक्त ताण येणार नाही़ हे नियोजन डॉ़ मुरंबीकर करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे प्रत्येक बुधवारी डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा ताण येतोे. सरकारने राज्यभरात दिव्यांग व्यक्तींसाठी एकच वार ठरवून दिला आहे. त्यामुळे बुधवारीच तपासणी करुन दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करावे लागते. प्रमाणपत्र देण्याची पद्धत आॅनलाईन असल्यामुळे अनेकदा इंटरनेट सेवा खंडित होते. त्यामुळे आॅनलाईन प्रमाणपत्र देण्यास विलंब होतो. -डॉ. पी. एस. मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक