विभागीय अप्पर आयुक्तांनी घेतला शेवगावच्या कोरोना परिस्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:21 AM2021-05-10T04:21:22+5:302021-05-10T04:21:22+5:30
शेवगाव : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी शेवगावात ...
शेवगाव : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी शेवगावात दाखल होत कोविड केअर सेंटर, खासगी कोविड सेंटर, शहरातील कंटेनमेंट झोनमधील करण्यात आलेल्या उपाययोजनाची पाहणी केली. उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना कोरोना चाचणी व लसीकरण वाढविण्याच्या सूचना दिल्या.
अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ठिकठिकाणी भेटी दिल्या. यावेळी
उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार अर्चना पागिरे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, गटविकास अधिकारी महेश डोके, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, नायब तहसीलदार मयूर बेरड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल शिरसाठ, विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर, संजय जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पालवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथील शासकीय कोविड केअर सेंटर, अथर्व हॉस्पिटल कोविड सेंटर, स्वर्गीय मारुतराव घुले पाटील कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय, तसेच अंबिका कॉलनी येथील कंटेनमेंट झोन भाग आदीची पाहणी करून तालुक्यातील ठाकूर निमगाव गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
भारदे हायस्कूल येथे सुरू असलेल्या कोरोना चाचणी केंद्रास भेट देऊन चाचण्या वाढविण्याच्या तसेच लसीकरण मोहिमेला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.