‘सेवाप्रीत’ने बांधली दिव्यांगांची लग्नगाठ : लग्न सोहळ्याचा केला सर्व खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:26 PM2019-08-31T13:26:08+5:302019-08-31T13:26:14+5:30
बदलत्या काळानुसार मुला-मुलींचे लग्न जुळविणे अवघड बनले आहे़ मुलगा आणि मुलगी दिव्यांग असेल तर या अडचणीत आणखीच भर पडते़
अहमदनगर : बदलत्या काळानुसार मुला-मुलींचे लग्न जुळविणे अवघड बनले आहे़ मुलगा आणि मुलगी दिव्यांग असेल तर या अडचणीत आणखीच भर पडते़ येथील सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने मात्र शहरातील अनामप्रेम संस्थेने आधार दिलेल्या दोन दिव्यांग जोडप्यांचा मोठ्या थाटात विवाह लावून देत त्यांच्या सुखी संसाराखी गाठ बांधली़
सेवाप्रीतच्या महिला सदस्यांनी आपल्या परीने मदत करत एखाद्या शाही विवाह सोहळ्याप्रमाणेच नगर शहरातील एका हॉटेलमध्ये या विवाहाचे आयोजन केले होते़ दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे़ अनामप्रेम संस्थेच्या पुढाकाराने ८ महिन्यापूर्वी दिव्यांग असलेल्या राहुल महामाहिम यांचा मोनिका फिस्के यांच्याशी तर धनंजय साळुंखे यांचा श्वेता इंगळे यांच्याशी विवाह ठरला. विवाह ठरलेल्या चारही जणांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विवाहाचा खर्च कसा पेलवायचा हा प्रश्न होता़ अनाम प्रेम संस्थेने सेवाप्रीतच्या सदस्यांपुढे हा विषय मांडला़ यावेळी संस्थेच्या सदस्यांनी क्षणाचाही विचार न करता लग्नाची तारीख ठरवण्याचे सांगून, संपूर्ण लग्न लाऊन देण्याची तयारी दर्शवली. सेवाप्रीतने वधू-वरांच्या कपड्यांपासून मंगळसूत्र तर लग्नातील पाहुण्यांच्या जेवणाची सर्वोत्तम व्यवस्था केली होती़ पाहुण्यांचे स्वागत अनामप्रेमचे अजित माने यांनी केले. हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, अन्नू थापर, गीतांजली माळवदे, गीता नय्यर, निशा धुप्पड, डॉ.सिमरन वधवा, सविता चड्डा, रितू वधवा, कशीश जग्गी, अनुभा अॅबट, रुपा पंजाबी आदिंनी परिश्रम घेतले.
विवाह झालेली मोनिका फिस्के ही स्नेहालयाच्या स्नेहाधारची माजी विद्यार्थिनी आहे. तिचे वडील फुगे विकून आपला उदरनिर्वाह करतात तसेच तिची आई मानसिकदृष्ट्या आजारी आहे़
मोनिकाने बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन स्नेहालयाच्या जनसंपर्क विभागात काम केले होते़ सध्या ती पुणे येथे नोकरी करुन पदवीचे शिक्षण घेत आहे.
राहुल महामाहिम याने नगरच्या पाऊलबुधे महाविद्यालयात इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. तो सध्या औरंगाबाद येथील कंपनीत कार्यरत आहे. दुसरे दांम्पत्य धनंजय हा सातारा येथील असून, त्याची पत्नी श्वेता श्रीरामपूर येथील आहे़