दिव्या कारखिले मृत्यू प्रकरण : पोलीस तपास अडकला प्रयोगशाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:15 AM2018-12-23T11:15:04+5:302018-12-23T11:15:21+5:30
पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सहावीतील बारा वर्षीय विद्यार्थिनी दिव्या हनुमंत कारखिले हिच्या शवविच्छेदनानंतरचे अहवाल प्रयोगाशाळांकडून पोलिसांना प्राप्त झालेले नाहीत.
शिरीष शेलार
जवळे : पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सहावीतील बारा वर्षीय विद्यार्थिनी दिव्या हनुमंत कारखिले हिच्या शवविच्छेदनानंतरचे अहवाल प्रयोगाशाळांकडून पोलिसांना प्राप्त झालेले नाहीत. अहवालाअभावी पोलीस तपास ठप्प झाला आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूचा तपास प्रयोगशाळेत अडकून पडला आहे.
२३ नोव्हेंबरला दिव्या घरातून बेपता झाली होती. त्यानंतर २६ नोव्हेंबरला घरापासून जवळच असणाऱ्या विहिरीतील पाण्यावर तिचा मृतदेह तरंगताना आढळला. बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसानंतरही तपास न लागल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होऊन शिरूर-राळेगण थेरपाळ मुख्य रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी ग्रामस्थांना शांत करण्यासाठी दिव्याचा मृतदेह ससून रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. पण मृतदेह कुजलेला असल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. त्यामुळे तिच्या शरीरातील काही भाग नाशिक व मुंबई येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पंधरा दिवसांत प्रयोगशाळांचे अहवाल येतील. त्यानंतर मृत्यूचे कारण व आरोपी निश्चित करणे शक्य होईल, असे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले होते.
दिव्या कारखिले हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास लागून आरोपीचा लवकरात लवकर शोध न लागल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
२५ दिवसानंतरही या घटनेच्या पोलीस तपासात प्रगती झालेली नाही. त्यामुळे नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याशी संपर्क साधला असता, नाशिक व मुंबई येथील प्रयोगशाळांमधून दिव्याच्या मृत्यूबाबत लेखी अहवाल आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
नाशिक येथील न्याय सहायक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल तयार झालेला आहे. परंतु मुंबई येथील न्याय सहायक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. नाशिक, मुंबई व पुणे येथील संबंधित डॉक्टर जो अहवाल देतील, तो मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करणे शक्य होईल. - बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक, पारनेर.