अधिकारी, शिक्षकांची पालावर दिवाळी
By Admin | Published: October 29, 2016 12:08 AM2016-10-29T00:08:09+5:302016-10-29T00:39:19+5:30
शेवगाव : सगळीकडे दिवाळीच्या तयारीची धामधूम सुरु असताना नेहमीच्या खेळण्यात दंग असलेल्या एरंडगाव येथील पारध्यांच्या पालावरील चिमुकल्यांसाठी नवे कपडे..
शेवगाव : सगळीकडे दिवाळीच्या तयारीची धामधूम सुरु असताना नेहमीच्या खेळण्यात दंग असलेल्या एरंडगाव येथील पारध्यांच्या पालावरील चिमुकल्यांसाठी नवे कपडे...गोड दिवाळी फराळ.. पिशव्या...आकाशकंदील..असे साहित्य अधिकारी व शिक्षकांनी देताच या बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेनासा झाला.
शिक्षण विस्ताराधिकारी शैलजा राऊळ यांनी शिक्षकांच्या एका बैठकीत गोरगरीब मुलांसाठी आपण वेगळी दिवाळी करण्याचा संकल्प केला. त्याला शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, मुख्याध्यापक गणपत दसपुते, सुधीर कंठाळी, अशोक गर्जे यांनी एरंडगाव येथील पारध्यांच्या पालावरील मुलांची निवड केली. यासाठी अधिकारी व शिक्षकांनी दहा हजार रुपये जमा करून दहा मुलां मुलींसाठी नवे कपडे, गोड दिवाळी फराळ, आकाशकंदील असे साहित्य घेतले.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेवगावपासून १५ किलोमीटर अंतरावरील एरंडगाव येथील माळरानावरील पारध्यांच्या पालावर जावून अधिकारी व शिक्षकांनी हे साहित्य वाटप केले. तेव्हा तेथे काही लहान मुलांना अक्षरश: कपडेच नव्हते. तर काहींचे कपडे अनेक ठिकाणी फाटलेले होते. अशा स्थितीत मिळालेली दिवाळी भेट पाहून सर्वांना गहिवरून आले. नवे कपडे पाहून या चिमुकल्यांना खूप आनंद झाला. यामधील सर्व मुले शाळेत दाखल असून ती नियमित शाळेत येत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. या वेळी राजेंद्र ढोले, पांडुरंग खरड, बाळासाहेब डमाळ यासह शिक्षक उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)