ज्ञानेश्वरनगरीत घुमला ज्ञानोबा-तुकोबाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:13 PM2017-07-20T12:13:16+5:302017-07-20T12:13:16+5:30
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी लोटलेल्या लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष केला़
आॅनलाइन लोकमत
नेवासा, दि़ २० - आषाढी वद्य कामीका एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी लोटलेल्या लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष केला़ या जयघोषाने गुरुवारी आसमंत दुमदुमला़
माऊलीच्या आषाढी वद्य कामीका एकादशीनिमित्त गुरुवारी पहाटे संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा संगीता बर्डे, दत्तात्रय बर्डे व उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, शुभांगी पाटील यांच्या हस्ते माऊलीच्या ‘पैस’ खांबास अभिषेक घालण्यात आला.
श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज, श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत सुनीलगिरी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी पंचगंगा सिडस् व जयहरी परिवार, रवी तलवार, मुस्लिम समाजबांधव, मारुतराव घुले पतसंस्था, मध्यमेश्वर पतसंस्थेच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.
नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो दिड्यांनी येथे हजेरी लावली होती. शहरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिरातही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी अकरापर्यंत एक ते दीड लाख भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले़ दिवसभरात पाच लाखापर्यंत भाविकांची उपस्थिती येथे राहील, असे शिवाजी महाराज देशमुख यांनी सांगितले.