डो-हाळे गावात नाहीत दुमजली घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:09 PM2019-06-23T16:09:26+5:302019-06-23T16:11:10+5:30
नाथभक्तीच्या श्रध्देपोटी राहाता तालुक्यातील डोºहाळे गावातील ग्रामस्थ आजही नाथ मंदिराच्या कळसाच्या उंचीच्या वर दुमजली घर बांधत नाहीत.
गणेश आहेर
लोणी:नाथभक्तीच्या श्रध्देपोटी राहाता तालुक्यातील डोºहाळे गावातील ग्रामस्थ आजही नाथ मंदिराच्या कळसाच्या उंचीच्या वर दुमजली घर बांधत नाहीत. पण याच नाथ भक्तीतून अनेक परंपरा, रितीरिवाज आजही तितक्याच श्रध्देने जपतायेत.
लोणीपासून २० किलोमीटर तर राहाता शहरापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर डोºहाळे हे जवळपास तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात नवनाथ भक्तांच्या दोन पुरातन समाधी आहेत. पूर्वी छोटेखानी असलेल्या या पुरातन समाधी मंदिराचा आता लोकसहभागातून जिर्णोध्दार केला आहे. जिर्णोध्दारपूर्वी या मंदिराचा कळस हा छोटेखानीच होता. जिर्णोध्दारानंतर आता या मंदिराचा कळस हा ६० ते ६५ फूट उंचीचा आहे. पण आजही नाथ महाराज कोपतील या भ्रामक कल्पनेतून या गावात कळसाच्या उंचीच्यावर कोणीही इमारत बांधत नाही. एवढेच काय तर आजही डोºहाळे या गावात अनेक जुने जाणते ग्रामस्थ बऱ्याचशा जुन्या रितीरिवाजाचे पुरस्कर्ते आहेत.
आषाढ व श्रावण महिन्यातील दर मंगळवारी आणि पौर्णिमेला बैलांना मशागतीला जुंपायचे नाही. पाणी आणताना महिलांनी हंड्यावर हंडे असे दोन हंडे घ्यायचे नाहीत. चक्रावर बसून गावात प्रवास करायचा नाही. म्हणजे सायकल, मोटारसायकल अशा दुचाकीवर बसायचे नाही आणि बसायचे ठरले तर या दुचाकी गावकुसाबाहेर लोटत न्यायच्या आणि मग प्रवास करायचा. कोणी बसल्याचे निदर्शनास आले तर त्याला दगड मारून खाली उतरायला भाग पाडले जाते. आलिकडच्या काळातील तरुण आणि शिक्षित वर्ग हे मानत नसला तरी जुने जाणते ग्रामस्थ ही रीत आजही सांभाळून आहे. याला येथील ग्रामस्थ ‘मोढा पाळणे’ असे संबोधतात. मग होळीच्या दिवशी त्यांची पूजा करून होळीच्या दुसºया दिवशी गावातील पराक्रमी कुटुंबातील लहान मुलांना सजवून त्यांच्या हातात तलवारी देत त्यांची मिरवणूक काढण्याचा रिवाज जपला जातो. धार्मिक भावनेतून आणि नाथबाबा या ग्रामदैवताच्या भक्ती पोटी या गावात या परंपरा, रिती, रिवाज चालू आहे. असे साईचरित्र प्रवचनकार श्रावण चौधरी यांनी सांगितले.